खड्ड्यांमुळे रिक्षात प्रसूत झालेल्या महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

जळगाव - पावसाळ्यानंतर शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळणी झाली असून, रस्त्यांच्या दुरवस्थेने एका गर्भवतीचा बळी घेतला. प्रसूतीसाठी आवार (ता. जळगाव) येथून धामणगाव आरोग्य केंद्राकडे निघालेली महिला रिक्षातच प्रसूत झाली आणि प्रकृती अस्वास्थामुळे तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (ता.2) घडली.

कविता सागर खंडारे असे मृत महिलेचे नाव आहे. वारंवार तक्रारी करूनही मंत्री, अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या अवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले असून, सरपंचासह ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आवार गावातील कविता सागर या गरोदर महिलेला प्रसववेदना सुरू झाल्यानंतर रिक्षातून धामणगाव आरोग्य केंद्रावर नेले जात होते. मात्र, आवार ते आवार फाट्यापर्यंतच्या खराब रस्त्याने ही महिला रिक्षातच प्रसूत झाली, तिने एका बाळाला जन्मही दिला. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने पुढील उपचार मिळेपर्यंत तिचा मृत्यू झाला.

अनेक वर्षांपासून प्रलंबित या रस्त्याचे काम पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अथवा कोणत्याही योजनेंतर्गत निधीची तरतूद करून मार्गी लावावे, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थ करीत आहेत. आता तरी संबंधित यंत्रणेने दखल घेऊन रस्त्याचे काम करावे, तसेच मृत महिलेच्या नातलगांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करीत आमरण उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.