जळगाव जिल्ह्यात २१ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

वन विभागाच्या संकेतस्थळावर ५० हजार हरित सेना सदस्यांची नोंदणी

जळगाव - शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा कृती कार्यक्रम हाती घेतला असून, यंदा चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत जळगाव जिल्ह्यात १ ते ७ जुलै या कालावधीत २१ लाख वृक्ष लागवड करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. वन विभागाच्या हरित सेना या संकेतस्थळावर ५० हजार हरित सेना सदस्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, अशी माहिती जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी यांनी दिली. 

जळगाव व यावल वन विभागातर्फे आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले उपस्थित होते. श्री. रेड्डी म्हणाले, की जिल्ह्यात २१ लाख १७ हजार रोप लागवड करण्यासाठी वन विभाग सामाजिक वनीकरण व इतर वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी जिल्हास्तर ४५ व तालुका स्तरावर २९० समन्वयक नियुक्त केले आहेत. ‘रोप आपल्या दारी’ ही योजना राबविण्यात येणार असून तालुकास्तरावर रोप वितरण केंद्र उघडण्यात येणार आहे. शासकीय निमशासकीय यंत्रणा सामाजिक संस्था महाविद्यालय, शाळा सेवाभावी संस्था अशा एकूण ३३ यंत्रणांचा सहभाग घेणार आहे.

www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पाचवीवरील विद्यार्थ्यांसह सर्व नागरिक नोंदणी करू शकतात. २५ जूनपर्यंत नोंदणी झालेल्या नागरिक, संस्थांना त्यांच्या मागणी नुसार वृक्षलागवडीसाठी अल्प शुल्कात रोपे दिली जाणार आहेत, तर ११५३ ग्रामपंचायतीत ३७५ रोपे प्रतिग्रामपंचायत मोफत दिली जाणार आहेत. २५ जूनपर्यंत हरित सेना सदस्य नोंदणी संकेतस्थळ बंद केले जाईल. त्यानंतर राहिलेल्या व्यक्ती, संस्थांना नाव नोंदण्यासाठी ‘माय प्लान्ट’ हे मोबाईल ॲप उपलब्ध केले आहे. इच्छुकांनी संकेतस्थळावर व मोबाईल ॲपवर नाव नोंदवावे, असे आवाहन रेड्डी यांनी केले. 

पुढच्या वर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वाढणार
शासनाचे ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पुढच्या वर्षी जिल्ह्यात १३ कोटींचे उद्दिष्ट वाढणार आहे. त्यासाठी मोठी जागा लागणार आहे. त्यामुळे आतापासूनच पुढच्या वर्षासाठी जागांचा शोध घेतला जाणार आहे. याबाबत नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.