राज्यात घातपात घडविणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

'इसिस'चे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

'इसिस'चे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
जळगाव - राज्यात मानवी बॉंबस्फोट घडवून मोठा घातपात करण्यात येणार असल्याचा उल्लेख असलेले "इसिस' या दहशतवादी संघटनेचे धमकीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला सोमवारी मिळाले. या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राजकीय नेते व धार्मिक स्थळे उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र पोलिस यंत्रणेकडे सोपवत गोपनीय विभागाला दक्षतेचा इशारा; तसेच चौकशीचा आदेश दिला आहे.

"इसिस'चा उल्लेख असलेले पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. हे पत्र टपाल विभागात आज सकाळी संबंधित कर्मचाऱ्यांना आढळले. जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेल्या धमकीपत्रानुसार सतर्कता म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना पत्र पाठविण्यात आले आहे. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक, जिल्हा पोलिस अधीक्षकांना या संदर्भात दक्षतेचा इशारा दिला आहे.

पत्रातील मजकूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, भाजप अध्यक्ष, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विश्‍व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना 16 ऑगस्टला मानवी बॉंबद्वारे उडविण्यात येईल. राजस्थान, पुणे, गुजरात येथील देवस्थाने, भुसावळ, अमरावती, नागपूर, पुणे, मलकापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालये, न्यायालये, रेल्वे स्थानक उडविण्यात येतील अशा स्वरूपाचा मजकूर या पत्रात आहे.