प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रिक्‍त पदांसाठी प्रस्ताव!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांची माहिती; शासनस्तरावरून बिंदुनामावलीचे मागणीपत्र देणार

जळगाव - जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था कोलमडलेली आहे. जिल्हा रुग्णालयापासून ग्रामीण रुग्णालयांतील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे बहुतांश कारभार ‘प्रभारीं’वर सुरू असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वर्ग तीन आणि चारची रिक्‍त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनस्तरावरून बिंदुनामावली मागविण्याबाबत पत्र देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बी. आर. पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रकाश टाकणारे वृत्त ‘सकाळ’ने सोमवारी (१७ जुलै) ‘थर्ड आय’मधून प्रसिद्ध केले होते. याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दखल घेत पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साथरोग पसरणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे जिल्ह्यात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ४४२ उपकेंद्रे असून, जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकाऱ्यांची
पदे रिक्त आहेत. तसेच ‘टीएमओ’ची आठ, अशी ४६ पदे रिक्त आहेत.

यातील वर्ग एक व दोनची रिक्‍त पदे भरण्याचे काम शासनस्तरावरून होत असते. मात्र, वर्ग तीन आणि चारची पदभरती ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केली जात असल्याने रिक्‍त जागांची माहिती पाठविण्यात आली असून, भरतीप्रक्रिया राबविण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून देण्यात आला आहे. याबाबत निर्णय आल्यानंतरच भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २६ पैकी १८ जागा भरल्या गेल्या असून, उर्वरित आठ जागांसाठी जाहिरात शासनस्तरावरून काढण्यात येईल; तर ग्रामीण रुग्णालयांतील २६ आणि शहरी भागातील रुग्णालयांमध्ये २३ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्‍त असल्याने याबाबतची बिंदुनामावली देण्याबाबतचे मागणीपत्र पाठविण्यात येणार असून, बिंदुनामावली आल्याने जाहिरात काढून भरतीप्रक्रिया केली जाणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.