'अभियांत्रिकी'च्या विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

जळगाव - बांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या एकोणीस वर्षीय तरुणीचा मृतदेह मेहरुण तलावात सोमवारी सकाळी आढळून आला. ऑर्डनन्स फॅक्‍टरी परीक्षेचा निकाल बघून येते असे सांगून गेलेली ही तरुणी रात्री उशिरापर्यंत न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. मित्राला तिची स्कूटी तलावाकाठी दिसल्यानंतर ओळख पटली. तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

शहरातील ऑटोनगर, एस. टी. कॉलनीतील रहिवासी सुरेशचंद्र गोपाळ पवार यांची एकोणीस वर्षीय मुलगी मयूरी रविवारी (ता.4) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ऑर्डिनन्स फॅक्‍टरीच्या परीक्षेचा निकाल बघण्यास जाते, असे सांगून स्कूटीने (एमएच.19ऐ.एच.485) निघाली.

रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरवात केला. मयुरीचा मोबाईल बंद येत असल्याने तिच्या मित्र-मैत्रिणींना फोन लावून शोध घेण्यात येत होता. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तिचा मित्र शुभम ऊर्फ कुणाल पवार याला मेहरुण तलावाच्या काठी मयुरीची स्कूटी आढळून आली. तिच्या वडिलांनी वाहन पाहून खात्री केल्यावर औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात या प्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली होती.

तलावात आढळला मृतदेह
सकाळी काठावरच मयुरीचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यावर सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील, शेखर पाटील, निंबाळकर, अश्रफ शेख आदी कर्मचाऱ्यांनी पोहणारे बोलावून मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबीय
कोंबडी बाजारात वेल्डिंग वर्कशॉपवर सुरेशचंद्र पवार कार्यरत असून आई शीलाताई गृहिणी, भाऊ हर्शल हा शिक्षण घेत आहे. कुटुंबात कुरबूर वाद असा काही प्रकारच झाला नसून तरुण मुलीने आत्महत्या केल्याचा प्रचंड धक्का आई-वडिलांना बसला आहे.

आत्महत्येच्या कारणांचा शोध
सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील यांनी चौकशीला सुरवात केली असून, मयुरीचा मोबाईल तिच्या स्कूटीच्या "डीक्की'त मिळून आला. त्यावरून आवश्‍यक माहितीचा शोध घेण्यात येत असून कुटुंबातील सदस्यांनाही प्राथमिक विचारपूस करण्यात आली. मित्र- मैत्रिणींकडूनही पोलिसांतर्फे माहिती घेण्यात येत आहे.

महापालिका केव्हा नेमेल सुरक्षारक्षक ?
शहरातील मेहरुण तलावात आत्महत्येचे प्रमाण काही दिवसांत वाढले आहे. उन्हाळी सुटीत पोहण्याचा आनंद घेणाऱ्या तरुणांनाही आपल्या प्राणास मुकावे लागल्याचा प्रकार घडला. तांबापुरातील रहिवासी सलमान पटेल याचे दोन दिवसांवर लग्न असताना तलावात बुडून मृत्यू झाला. तलावात आत्महत्येच्या घटनाही सातत्याने घडत असताना महापालिकेकडून तलावाच्या काठावर सुरक्षारक्षकही नेमण्यात आलेले नाहीत. रात्रगस्तीला पोलिस वाहन येऊन निघून जाते. त्यामुळे तलाव व तलावाकाठची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची स्थिती आहे.