शाडू मातीपासून साकारणार विद्यार्थी बाप्पाची मूर्ती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

जळगाव - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) या शालेय विद्यार्थ्यांच्या व्यासपीठांतर्गत गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शाडू मातीपासून बाप्पाची मूर्ती साकारण्याची संधी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेतून मिळणार आहे. ही कार्यशाळा उद्या (२० ऑगस्ट) होईल. 

‘सकाळ’ व ‘कुतूहल फाउंडेशन’तर्फे शहरातील प. न. लुंकड कन्या शाळेच्या मैदानावर सकाळी दहाला कार्यशाळा होईल. त्यात अनिता पाटील शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देतील. विद्यार्थ्यांनी स्वतः पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून तिची आपल्या घरी प्रतिष्ठापना करावी, या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. नि:शुल्क व सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या या कार्यशाळेत तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येईल. 

मूर्ती साकारण्यासाठी देणार शाडू माती गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मूर्ती साकारण्यासाठी लागणारी शाडू माती व पाणी ‘सकाळ’तर्फे पुरविले जाईल. विद्यार्थ्यांनी केवळ येताना चौरस आकाराचा पुठ्ठा सोबत आणावयाचा आहे. शहरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभागाचे आवाहन ‘सकाळ-एनआयई’तर्फे करण्यात आले आहे. या कार्यशाळेप्रसंगी ‘एनआयई’ची सभासद नोंदणी सुरू राहणार असून, अधिक माहितीसाठी ‘एनआयई’ समन्वयिका हर्षदा नाईक (८६२३९१४९२६) यांच्याशी संपर्क साधावा. 

पालकांचाही सहभाग 
चिमुरड्यांच्या हाताने साकारण्यात येणारी गणेशमूर्ती पाहण्यासाठी पालकांनीही उपस्थिती द्यावी. तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत आपल्या पाल्यांसमवेत बाप्पाची मूर्ती तयार करणे शिकता येणार आहे. पालकांनी पाल्यासह कार्यशाळास्थळी सकाळी साडेनऊपर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.