जळगाव शहरात धो धो पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

गटारी, नाले ओसंडल्याने घरांमध्ये शिरले पाणी; वीजपुरवठा खंडित

जळगाव - गेल्या पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह जिल्ह्यातील काही भागांत कालपासून पावसाला सुरवात झाली. त्यात आज दुपारी चारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात होऊन तो पाऊण तास कोसळला. त्यामुळे शहरातील विविध भागांतील गटारी तसेच नाले ओसंडल्याने ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून ते काही घरांमध्ये शिरल्याचे चित्र आज जळगावकरांना पाहावयास मिळाले. पावसामुळे शहरातील रस्त्यांसह महामार्गावरील वाहतूक या काळात ठप्प झालेली पाहावयास मिळाली.

रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना त्यातून वाट काढताना कसरत करावी लागली. पावसामुळे सायंकाळी शहरातील वीजपुरवठा खंडित झाला.

यंदाच्या पावसाळ्यात आजवर दमदार पाऊस झालाच नव्हता. शिवाय गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागले होते. यात दोन दिवसांपासून जिल्ह्यात तुरळक पावसाला सुरवात झाली. आजही सकाळी काही वेळ रिमझिम कोसळला. त्यानंतर मात्र दुपारी तीनच्या सुमारास आकाशात ढगांनी गर्दी केल्याने सर्वत्र काळोखाचे वातावरण तयार होऊन चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. पाऊणतास पाऊस सारखा सुरूच राहिल्याने शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले. 

रस्त्यांवर पाणी 
जोरदार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणीच पाणी साचले. आज रविवार असल्याने शहरात फारशी वर्दळ नव्हती. मात्र, तरी देखील पादचारी, वाहनधारक व विक्रेत्यांची पाऊसकाळात तारांबळ उडाली. नटवर टॉकीज चौक, आठवडे बाजाराचा रस्ता, रेल्वेस्थानक चौक, पत्र्या हनुमान मंदिराजवळील चौक, ख्वाजामियाँ चौकाजवळील नाल्याला पाणी येऊन ते रस्त्यावरून वाहू लागल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. तसेच शनिपेठ, मेहरूण, हरिविठ्ठलनगर, रामेश्‍वर कॉलनी या भागांमधील जमिनीलगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले.

नाल्यांना पूर 
जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असताना शहरातून वाहणारे नालेही पाण्याने तुंडूब भरले होते. हरिविठ्ठलनगर भागाकडील श्रीधरनगरजवळील नाल्याला पाणी आल्याने त्यावरील वाहतूक काही वेळ बंद झाली होती.