जिल्ह्यात होणार प्रथमच ‘सेन्सॉर बोर्डा’ची बैठक - अरुण नलावडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

जळगाव - नाटक हे कधी मरत नसते, परंतु सध्याची परिस्थिती पाहता नाटक कायम सुरू ठेवायचे असेल, तर स्पर्धांच्या माध्यमातून चळवळ उभारली पाहिजे. जळगाव जिल्ह्यात चांगले नाट्य कलावंत घडत असून, या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘सेन्सॉर बोर्डा’ची बैठक घेणार असल्याची माहिती, सुप्रसिध्द सिनेनाट्य अभिनेते तथा सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी दिली.

जळगाव - नाटक हे कधी मरत नसते, परंतु सध्याची परिस्थिती पाहता नाटक कायम सुरू ठेवायचे असेल, तर स्पर्धांच्या माध्यमातून चळवळ उभारली पाहिजे. जळगाव जिल्ह्यात चांगले नाट्य कलावंत घडत असून, या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘सेन्सॉर बोर्डा’ची बैठक घेणार असल्याची माहिती, सुप्रसिध्द सिनेनाट्य अभिनेते तथा सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी दिली.

अभिनेते नलावडे हे आज पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्यानिमित्ताने जळगावात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जळगावातील कलाकारांचे कौतुक करत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सेन्सॉर बोर्डाची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. यानिमित्ताने कलाकारांच्या अडचणी जाणून घेण्यास मदत होईल. पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रासारखी दुसरी रंगभूमी नाही. याठिकाणी मराठी तरुण हा स्वतः नाटक लिहितो व ते सादर करतो. फक्त त्याला मार्गदर्शनाची गरज आहे. यासाठी सेन्सॉरची स्थापना करण्यात आली आहे. सेन्सॉरच्या माध्यमातून अनेक जुने नाटक जिवंत करण्यात आले आहे. त्यांचा सर्व रेकॉर्ड बोर्डाने तयार केला आहे.

नाटकाचे महत्त्व वाढले
पूर्वी आम्ही ज्यावेळी जळगावात नाटक करण्यासाठी यायचो त्यावेळी आम्हाला पाहिजे तशी जागा मिळत नव्हती, मात्र आता नाट्यगृह सुरू होणार असल्याची माहिती मिळाल्याने आनंद वाटतोय. त्याचसोबत जळगावातील कलाकार इतक्‍या मोठ्या संख्येने नाटक सादर करताहेत हे पाहून खूप आनंद वाटत असल्याचे नलावडे यांनी सांगितले.

‘जीएसटी’मुळे तिकीट महाग
नलावडे म्हणाले, नव्याने लागू झालेल्या जीएसटीमुळे नाटकाचे तिकीट महाग झाले आहे. सर्वसामान्यांना हे तिकीट परवडत नाही. त्यामुळे शासनाने नाटकाच्या तिकिटावरील जीएसटी कमी केला पाहिजे. नाटक ही कला आहे. कला जिवंत राहिली तरच माणूस जिवंत राहील याचा शासनाने विचार करायला हवा. यासाठी नाट्य व सिनेक्षेत्रातर्फे देखील प्रयत्न सुरू आहे.

नावलैकिकासाठी हवे कामात सतत सातत्य
सिनेमा, नाटक यांसारख्या माध्यमातून यशस्वी अभिनेता म्हणून नावलौकिक मिळवायचे असेल, तर आपल्या कामात सातत्य, मेहनत घेण्याची तयारी हवी. आजूबाजूचे जग समजून घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते अरुण नलावडे यांनी व्यक्त केले.

मूळजी जेठा महाविद्यालयात मराठी विभागातर्फे ‘चौकटी बाहेरचे जग’ या व्याख्यानमालेतंर्गत ‘श्वास’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे सहनिर्माते तथा सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते अरुण नलावडे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते.पुढे बोलताना अभिनेते नलावडे यांनी सांगितले की, कोणतीही भूमिका साकारताना बारकाईने त्यातील सर्व बाबी पाळल्या पाहिजेत. एखादी भूमिका यशस्वी करण्यासाठी त्या भूमिकेत आपल्याला शिरता आले पाहिजे. तुमच्या कलाकौशल्याला आकार देण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे. मी माझ्या अभिनयातील शिस्त ही अभिनेते श्रीराम लागू यांच्याकडून शिकलो, त्यामुळे मला आयुष्यात खूप फायदा झाला. कोणत्याही कलाकाराने अभिनयाची सुरवात हौशी रंगभूमीवर केली पाहिजे. खरा कलावंत घडविण्याचे काम नाटकच करते, त्यामुळे मालिकांमध्ये फार न रमता रंगभूमीवरच मेहनत घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना नलावडे यांनी उत्तरे दिली. याप्रसंगी केसीई सोसायटीचे सदस्य ॲड. सुनील चौधरी, सभासद प्रा. चारुदत्त गोखले, शशिकांत वडोदकर, मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील, प्रा. चारुता गोखले, प्रा. गणेश सूर्यवंशी, प्रा. विजय लोहार महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी, जळगाव शहरातील रंगकर्मी, नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. योगेश महाले यांनी सूत्रसंचालन केले.

‘श्‍वास’ ठरला ऊर्जा देणारा
श्री. नलावडे यांनी सिने- नाट्यसृष्टीत काम करताना आलेले अनेक अनुभव कथन करताना सांगितले की, कोणत्याही क्षेत्रात काम करताना अनुभव माणसाला मोठं करतो. सर्वसामान्य माणसाचे जगणे समजून घेण्यासाठी विविध भूमिका उपयुक्त ठरतात. तानी, श्वास हे मला अभिनेता म्हणून ऊर्जा देणारे चित्रपट ठरल्याचे त्यांनी सांगितले.