पाऊस लांबणीवर पडल्याने पेरण्यांना ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

बियाणे विक्री थंडावली; केवळ १६ हजार क्विंटलची झाली विक्री

जळगाव - गेल्या रविवारी (ता. ११) जळगाव तालुक्‍यात अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. ती आज सातव्या दिवशीही कायम होती. पाऊसच लांबल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी लांबणीवर टाकली आहे. परिणामी बियाणे विक्रीच्या दुकानांवर बियाणे खरेदीही मंदावली आहे. आतापर्यंत १६ हजार २७८ क्विंटल बियाण्यांची विक्री झाल्याचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात खरीपपूर्व व सात जूनला पडलेल्या पावसामुळे आतापर्यंत सोळा टक्के पेरण्या झाल्या आहेत. दमदार पावसाची शेतकरी वाट पहात आहे. गेल्या रविवारी शहरात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील जामनेर, यावल, रावेर, मुक्ताईनगर वगळता इतर ठिकाणी जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे पेरण्यांना वेग आलेला नाही. पहिल्याच पावसानंतर पाऊस येईल याचा नेम नसल्याने शेतकरी सावध राहून पेरण्या करताना दिसत आहे.जूनचा पंधरवडा उलटला तरी जिल्ह्यात सर्वत्र पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. पावसाविषयी शेतकरी विविध अंदाज बांधत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण तयार होते नंतर मात्र ढग दुसरीकडेच निघून जातात. 

असह्य उकाड्याने हैराण
दिवसा व रात्रीही हवा बंद झाली की असह्य उकाडा होत असल्याने नागरिक हैराण होत आहे. मॉन्सून सुरू होऊन पंधरावाड्यानंतरही अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने आद्रतेचे प्रमाण वाढून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. त्यातच भारनियमनालाही सामोरे जावे लागत आहे. नागरिकांची ए.सी., कुलर, पंखे लावून गारवा मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
सतरा लाख कपाशीची पाकिटे

जिल्ह्यात एकूण ४८ हजार २८८ क्विंटल बियाण्यांची मागणी होती. कृषी विभागाने ३४ हजार ९९२ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिलेले आहे. त्यातील १६ हजार २७८ क्विंटल बियाणे विक्री झाली आहेत. तर विविध कंपन्यांची कपाशी वाणाची सुमारे १७ लाख ३ हजार ५२१ पाकिटांची विक्री झाली आहे.

जिल्ह्यात कपाशीची ७० ते ८० टक्के पेरणी झालेली आहे. पाऊस लांबल्याने तूर, उडीद, भुईमुगासह इतर पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी सुमारे ४० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव