ट्रकसह २५ लाखांच्या मालावर डल्ला मारणारे दोघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

जळगाव - गुजरातमधून ‘सिंथेटिक फायबर कॉटन’चा २५ लाख रुपये किमतीचा माल नागपूरच्या कंपनीत न पोचविता मध्येच त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न एमआयडीसी पोलिसांनी रविवारी (ता. १७) हाणून पाडल्यानंतर दोन ट्रकसह एकास अटक केली होती. मात्र, कंपनीतून निघालेला मूळ ट्रक  व त्याचा चालक गायब होता. मात्र, पोलिसांनी मूळ दहा चाकी ‘ट्राला’चा मालासह सौदा करणारा चालक आणि ट्राला भंगार बाजारात नेऊन गिळंकृत करणाऱ्या भंगारमाफियांचा पोलिस शोध घेत होते. त्यापैकी ट्रॉला घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. 

औद्योगीक वसाहत परिसरातील काशिनाथ चौक रस्त्यावर मोठ्या दहाचाकी ट्रॉलामधून (सीजी.०४ जेबी.१४७९) आणलेला माल ट्रक (एमएच.०४. सीयू.२०८) व (एमएच.०४  सीयू.९८६०) या दोन ट्रकमध्ये मालाची परस्पर विल्हेवाट लावून हा ट्राला गायब झाला होता. सिंथेटिक कॉटन फायबरने भरलेला माल एका ट्रकमधून दुसऱ्या ट्रकमध्ये भरत असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता ट्रकसह मालाचा सौदा करून ट्रक चालक पसार झाल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणी तस्लिम खान अय्यूब खान (रा. पाळधी. ता. धरणगाव) याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. आज त्याला न्या. बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी दोन दिवस पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहे. सरकारपक्षातर्फे ॲड. तडवी, बचाव पक्षातर्फे ॲड. शरीफ पटेल यांनी कामकाज पाहिले.  

२५ लाखांचा माल २० लाखांचा ट्रक
गुजरात येथील प्रीत ट्रान्सपोर्टचा मूळ चालक दीपक चैत्राम यादव याने नागपूरसाठी २८ जूनला सुरेश यादवला ट्रक नेण्यास सांगितले. त्याने नंतर जळगावात ट्रॉला आल्यावर २५ लाखांच्या मालाची दोन वेगवेगळ्या ट्रकमध्ये विल्हेवाट लावली. नंतर वीस लाखापर्यंत किंमत असलेला ट्रॉला जाबीर खान साबीर खान व मोसीन सय्यद मुश्‍ताक या दोघांना सोपवून पोबारा केल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली असून हा ट्रॉला किती रुपयांत घेतला व तो घेतल्यानंतर कुठे विक्री केला किंवा भंगारात त्याची विल्हेवाट लावली याचा शोध पोलिस घेत आहे.

दोन भामटे पोलिसांच्या तावडीत 
ट्रकचा शोध घेत असताना पोलिसांनी जाबीर खान साबीर खान (वय ३१, रा. मास्टर कॉलनी), मोसीन सय्यद मुश्‍ताक (वय२५, रा. सुप्रिम कॉलनी) या दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांवर दहाचाकी ट्राला घेऊन पोबारा करण्याचा संशय पोलिसांना असून चौकशीनंतर नेमके प्रकरण समोर येणार असल्याचे निरीक्षक सुनील कुराडे यांनी सांगितले.