सेवाशर्ती, निवृत्तिवेतनासाठी 'जीवन प्राधिकरण'चा संप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

नाशिक - नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सेवा, सवलतींची जबाबदारी राज्य सरकारने घेत विविध आश्‍वासनांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी व अधिकाऱ्यांचा रविवारी मध्यरात्रीपासून संप सुरू झाला. सोमवारी संपाचा पहिलाच दिवस होता. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी पुरवठा विस्कळित होणार नाही, याची दक्षता घेण्याचा आदेश असल्याने तूर्त जिल्ह्यातील 120 गावांचा पाणीपुरवठा सुरळीत आहे; मात्र दोन दिवसांत सरकारने निर्णय न घेतल्यास तो विस्कळित होण्याची भीती आहे.

राज्यात असे 15 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तिवेतनाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी दीड वर्षापूर्वी संप केला होता. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्याचे आश्‍वासन देऊनही ते पाळले गेले नसल्याने कृती समितीने बेमुदत संपाचा इशारा दिला. मध्यरात्री बारापासून हा संप सुरू झाला. कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांनी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मंगळवारी (ता. 7) मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले. तोपर्यंत पाणीपुरवठा विस्कळित होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे; परंतु तोडगा न निघाल्यास ते पाणीपुवठ्याचे काम करणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: jeevan pradhikaran strike