75 टक्के असंघटित कामगार राहतात लाभांपासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

जे कामगार प्रत्यक्ष येऊन स्वतःच्या नोंदणीचे दर वर्षी नूतनीकरण करतात त्यांनाच कल्याणकारी योजनांचा फायदा होतो. असे केवळ 17 हजार 502 कामगारच नूतनीकरण करत असल्याचे आढळून आले आहे. आजही कामगार जगतामध्ये 92 टक्के कामगार असंघटित क्षेत्रात आहेत

नाशिक - असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी 19 प्रकारच्या कल्याणकारी योजना लागू असल्या, तरी अटी-शर्तींचे पालन अवघे 25 टक्के कामगारच करीत आहेत. त्यामुळे 75 टक्‍के कामगारांना हक्काच्या लाभांवरही पाणी सोडावे लागत आहे. अटल पेन्शन, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवनज्योत विमा योजना आदी योजमांच्या लाभापासून ते वंचित आहेत.

नाशिक विभागात 69 हजार असंघटित कामगारांनी नोंदणी केली होती. जे कामगार प्रत्यक्ष येऊन स्वतःच्या नोंदणीचे दर वर्षी नूतनीकरण करतात त्यांनाच कल्याणकारी योजनांचा फायदा होतो. असे केवळ 17 हजार 502 कामगारच नूतनीकरण करत असल्याचे आढळून आले आहे. आजही कामगार जगतामध्ये 92 टक्के कामगार असंघटित क्षेत्रात आहेत. आठ तासांची ड्यूटी कागदावरच राहिल्याने त्यांना बारा-बारा तास राबावे लागते. भविष्य निर्वाह निधी, राज्य कामगार विमा योजनेच्या लाभासाठी झगडावे लागते. 20 पेक्षा अधिक कामगार असल्यास कामगार कायदा लागू होतो. मात्र, कामावर दहापेक्षा कमी कामगार ठेवून या कायद्यातून पळवाटा शोधल्या आहेत.

कामगार लेखी तक्रार करत नसल्याने कामगार कायद्यानुसार कारवाई होत नाही. कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी 19 प्रकारच्या लाभाच्या योजना जाहीर केल्या आहेत. मात्र त्यांचा लाभ घेण्यासाठी अटी-शर्तींचे पालन व नूतनीकरण होत नाही.

Web Title: labors deprived of benefits

टॅग्स