कुंडाणे, नगावबारी परिसरात छाप्यात लाखाची दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

शहरातील देवपूरमधील नगावबारी व कुंडाणे (ता. धुळे) शिवारातून विदेशी दारू व बिअरचा साठा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, जप्त माल पुरविणारे कोण, याचाही शोध घेतला जात आहे.

धुळे - शहरातील देवपूरमधील नगावबारी व कुंडाणे (ता. धुळे) शिवारातून विदेशी दारू व बिअरचा साठा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, जप्त माल पुरविणारे कोण, याचाही शोध घेतला जात आहे.

पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आज दुपारी कुंडाणे (ता. धुळे) शिवारात पाहणी केली. शिवारातील हॉटेल आदितीवर छापा टाकून व्हिस्की, विदेशी दारूसह बिअरचा साठा जप्त केला. हॉटेलमधील 22 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित व्यवस्थापक भाऊसाहेब जगन्नाथ पाटील (वय 57, रा. महिंदळे, ता. धुळे) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पठाण, हवालदार जितेंद्र आखाडे, महेंद्र कापुरे, आरिफ शेख, विजय सोनवणे, तुषार पारधी, अमित रनमळे, गौतम सपकाळे, चेतन कंखरे यांनी ही कारवाई केली.

रिक्षात विदेशी दारूची खोकी
देवपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडून काल (ता. 6) रात्री आठनंतर गस्त सुरू होती. आज सकाळीही पाहणी सुरू असताना देवपूरमधील नरडाणा चौफुलीजवळ पोलिसांनी काही वाहनांची तपासणी केली. शिरपूरकडून येणाऱ्या रिक्षाची (एमएच18/डी8438) तपासणी केली असता तीत विदेशी दारूची खोकी आढळली. बेकायदेशीररीत्या दारूची वाहतूक होत असल्याचे चौकशीत आढळले. रिक्षाच्या मागील सीटमागे पाच खोकी होती. रिक्षासह दोन संशयितांना ताब्यात घेतले. हवालदार विनोद साहेबराव अखडमल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेश माणिक सुपनर (वय 35), महेंद्र पुंडलिक धोंडे (वय 29, रा. राऊळवाडी, चितोड रोड) यांच्याविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयितांच्या ताब्यातून व्हिस्कीसह रिक्षा, दोन मोबाईल असा 64 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक के. बी. शिरसाट, हवालदार विनोद अखडमल, प्रवीण थोरात, के. आर. पाटील, शेखर देशमुख यांनी कारवाई केली.

Web Title: Liquior seized from Kundane, Nagavbari