महाराष्ट्र सायबरच्या हेल्पलाइनकडे राज्यातून साडेसातशे कॉल प्राप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

'रॅन्समवेअर'बाबत क्‍वीकहिलच्या सहाय्याने मार्गदर्शन

'रॅन्समवेअर'बाबत क्‍वीकहिलच्या सहाय्याने मार्गदर्शन
नाशिक - रॅन्समवेअर व्हायरसमुळे धोका वाटत असलेल्या किंवा या संदर्भात अधिक माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने मोफत सहाय्यता क्रमांक (हेल्पलाइन) सुरू केला आहे. क्‍वीकहिलच्या सहाय्याने दोन दिवसांसाठी सुरू केलेल्या या सेवेच्या आज पहिल्या दिवशी राज्यभरातून सुमारे साडेसातशे कॉल प्राप्त झाले. त्यांपैकी सुमारे शंभर नाशिक जिल्ह्यातील होते.

विशेष पोलिस महानिरीक्षकांनी काल ट्‌विटरच्या माध्यमातून रॅन्समवेअर व्हायरससंदर्भातील मार्गदर्शनासंदर्भात सहाय्यता क्रमांक जाहीर केला होता. यात बाधित झालेल्या व्यक्‍ती किंवा ज्यांना या व्हायरसपासून बचाव करायचा आहे, माहिती मिळवायची आहे, अशा व्यक्‍तींना या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले होते. आज व उद्या (ता. 17) असे दोन दिवस हा संपर्क क्रमांक खुला करून दिला आहे. आज दिवसभरात सुमारे साडेसातशे कॉल प्राप्त झाले. कॉल करणाऱ्यांत वैयक्‍तिक, कंपन्यांसह व्यावसायिकांचा समावेश होता. विचारल्या गेलेल्या प्रश्‍नांमध्ये बाधित झालेल्या व्यक्‍तींची संख्या अल्प होती. या व्हायरसविषयी माहिती जाणून घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले.

अशी घ्या काळजी
शक्‍यतो एक्‍सपी या ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या संगणकांना व्हायरस हल्ल्याचा धोका अधिक आहे. ऑपरेटिंग सिस्टिम पॅचअप करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. प्राप्त झालेला संशयित ई-मेल न उघडता डिलीट करावा. अनावश्‍यक अटॅचमेंट डाउनलोड करू नये, असा सल्लाही देण्यात आला. अधिक माहितीसाठी 0253-6631777 या हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल.

महाराष्ट्र सायबर विभागाच्या सहकार्याने क्‍वीकहिलतर्फे हेल्पलाइन क्रमांक सुरू केला असून, त्याद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. ज्या गॅजेट्‌सवर क्‍वीकहिल ऍन्टिव्हायरस आहे, त्यात रॅन्समवेअरला आळा घालण्यासाठी आधीच टूल उपलब्ध करून दिले आहे. हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे.
- विशाल जोगदंड, व्यवस्थापक, नाशिक टेक सपोर्ट सेंटर