''मेक इन इंडिया'चे दहा लाख कोटी गुंतवणुकीचे प्रस्ताव कागदावर'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

नाशिक : ‘मेक इन इंडिया‘चा मोठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. प्रत्यक्षात दहा लाख कोटी गुंतवणुकीचे प्रस्ताव कागदावर राहिले आहेत. एवढेच नव्हे, तर किमान वेतन व कायदेशीर हक्कासाठी युनियन करणाऱ्या कामगारांनी युनियन सोडावी, यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप "सीटू‘च्या नाशिकमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला.

नाशिक : ‘मेक इन इंडिया‘चा मोठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. प्रत्यक्षात दहा लाख कोटी गुंतवणुकीचे प्रस्ताव कागदावर राहिले आहेत. एवढेच नव्हे, तर किमान वेतन व कायदेशीर हक्कासाठी युनियन करणाऱ्या कामगारांनी युनियन सोडावी, यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप "सीटू‘च्या नाशिकमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला.

या वेळी झालेल्या चर्चेत सईद अहमद, डॉ. डी. एल. कराड, एम. एच. शेख यांनी सहभाग घेतला. राज्यातील भाजप-शिवसेना युतीचे सरकार कामगारांच्या प्रश्‍नांकडे लक्ष देत नाही, असे सांगून डॉ. कराड म्हणाले, की सरकारच्या सर्वच विभागांत तीन लाख पदे रिक्त असतानाही नोकरभरती न करता कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. नाशिक महापालिकेत नियमित भरती करण्याचा लोकप्रतिनिधींचा प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळून लावला. राज्य सरकारने "सेंट्रल किचन‘चा निर्णय घेऊन दीड लाख शालेय पोषण कामगारांना बेरोजगार करण्याचा घेतलेला निर्णय "सीटू‘ने आंदोलन करून हाणून पडला.
 

पश्‍चिम बंगालमधील स्थितीचा आढावा
सोलापूरचे श्री. शेख यांनी बांधकाम, यंत्रमाग व विडी कामगार आदींच्या संघर्षावर प्रकाश टाकला. मुंबईच्या श्रमिक चळवळीचाही त्यांनी आढावा घेतला. याशिवाय पश्‍चिम बंगालमधील सद्यःस्थितीचा आढावा बैठकीत घेतला. प. बंगालमधील निवडणुकांनंतर सहा कोटींपेक्षा अधिक किमतीच्या मालमत्ता गुंडांनी लुटल्या, अथवा जाळून टाकण्यात आल्या. 139 कामगार संघटना व इतरांच्या कार्यालयांवर हल्ला करून ते ताब्यात घेण्यात आले. तीन कोटींहून अधिक रक्कम सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाखालील समाजकंटकांनी लोकांना त्यांच्या वस्तीत राहू देण्यासाठी वसूल केली. 21 गावे जाळण्यात आल्याचा आरोप करत प्रतिनिधींनी पश्‍चिम बंगालमधील त्रस्त जनतेसाठी देशभरात भातृभाव चळवळ उभारण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन सप्टेंबरच्या देशव्यापी संपाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारसह भारतीय मजदूर संघाच्या नेत्यांकडून दिशाभूल करणारा प्रचार केला जात असल्याबद्दलची खंतही व्यक्त करण्यात आली.
 

सिडकोत आज सभा
"सीटू‘च्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीची सांगता उद्या (ता. 16) सायंकाळी साडेपाचला सिडकोतील माउली लॉन्समधील सभेने होईल. श्री. सेन, डॉ. कराड, नरसय्या आडम, आमदार जे. पी. गावित यांची भाषणे होतील. बैठकीतील ठरावांवर शिक्कामोर्तब होईल. याच सभेत श्रीधर देशपांडे यांच्या लेखसंग्रहाचे प्रकाशन होईल. कामगार चळवळ, कार्ल मार्क्‍स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्याविषयीच्या लेखांचा त्यात समावेश असेल.