निवडणूक यंत्रणा लागली कामाला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

मतदानाला येणाऱ्या दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर्सची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर उताराचा रस्ता आहे. मतदान केंद्रावर रुग्णवाहिका व इतर सुविधा पुरविण्यात येणार आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदारांना सावली व पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे.
-रवींद्र जगताप, आयुक्त, मालेगाव महापालिका

मालेगाव कॅम्प - महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. बॅलेट व कंट्रोल युनिटची पहिल्या टप्प्यात संबंधित शंभरावर कर्मचारी तपासणी करीत आहेत. 24 मेस होणाऱ्या मतदानासाठी तीन हजार 96 अधिकारी व कर्मचारी यांचे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणास अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

एकूण 516 मतदान केंद्रांवर होणाऱ्या मतदानासाठी 600 कंट्रोल युनिट व दोन हजार 400 बॅलेट युनिट नाशिक महापालिकेकडून मागविली असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त डॉ. संदीप पठारे व सहाय्यक उपायुक्त राजू खैरनार यांनी दिली. पहिल्या पातळीवर सर्व मशिन तपासली जात आहेत. दरम्यान, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येणाऱ्या दिव्यांगांना प्राधान्याने सहकार्य करावे, त्यांचा उचित सन्मान मतदानाच्या वेळी करावा, असे आवाहन निवडणूक कर्मचारी प्रशिक्षणात मुंबईच्या त्रिनयन एनजीओच्या निवडणूक मार्गदर्शक रुतिका सहानी यांनी केले. सर्वसामान्य मतदारांसह दिव्यांगांना प्रत्येक केंद्रावर सहकार्य करावे. या दिव्यांगांमध्ये दृष्टिदोष, शारीरिकदृष्ट्या अपंग, विकलांग, मूकबधिर अशा सर्वांना निवडणूक कर्मचारी व अधिकारी यांनी सौहार्दपूर्ण वागणूक द्यावी, अशी सूचना त्यांना केली.