जंतर-मंतरवर १८ ला आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

मालेगाव - देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व हमीभाव मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे येत्या १८ जुलैला दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन केले जाईल. देशातील शेतकऱ्यांच्या १४० पेक्षा अधिक संघटना एका छताखाली येऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत. मोदी सरकारला गुडघे टेकविण्यास भाग पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी टेहेरे येथील जाहीर सभेत केले.

मध्य प्रदेशातील आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांचे अस्थिकलश घेऊन जाणारी किसान मुक्ती यात्रा आज येथे पोचली असता टेहेरे येथे सभा झाली. सरपंच विमलबाई शेवाळे अध्यक्षस्थानी होत्या. शेतकरी नेते व्ही. एम. सिंग, योगेंद्र यादव, महेशचंद्र शेखर, रविकांत तुपकर आदी व्यासपीठावर होते. खासदार शेट्टी म्हणाले, की 

६ जुलैपासून निघालेली ही किसान मुक्ती यात्रा अनेक राज्यांमध्ये जाणार आहे. शेतकरी आंदोलनाने फडणवीस सरकारला गुडघे टेकायला लावले. मात्र, मनासारखे झाले नाही. शेतकऱ्यांच्या मनासारखा निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील. ‘अच्छे दिन’ म्हणणाऱ्यांचा खरा चेहरा आंदोलनात समोर आला. मोदींच्या भूलथापांना मीदेखील बळी पडलो. दुष्काळ व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे कर्ज थकले. शेतमालाला भाव नाही. मोदींनी हमीभावाचे आश्‍वासन निवडणुकीत दिले होते. पंतप्रधान व अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तीन वर्षांत झालेली चूक आगामी दोन वर्षांत सुधारली नाही, तर त्यांनी २०१९ नंतर लाल किल्ल्यावरून भाषण करण्याचे स्वप्न पाहू नये. देशभरातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. यासाठी तरुण शेतकऱ्यांनी दिल्लीच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. श्री. सिंग, तुपकर, यादव आदींची या वेळी भाषणे झाली. गावातील शेतकरी कन्या साक्षी शेवाळे हिने शेतकऱ्यांची व्यथा मांडली. शेतकरी आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शेतकऱ्यांनी अस्थिकलशाचे पूजन केले. प्रा. के. एन. अहिरे, प्रा. विजय शेवाळे, शेखर पवार, अनिल निकम, संदीप शेवाळे, चंद्रकांत पाटील, डॉ. एस. के. पाटील, डॉ. तुषार शेवाळे, शांताराम लाठर, वसंत निकम, राजेंद्र भोसले आदींसह शेतकरी उपस्थित होते.