अडीच लाखांवर भाविक आदिमायेचरणी नतमस्तक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

वणी - सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवातील ललिता पंचमीनिमित्त भाविकांचा महापूर लोटला. सुमारे अडीच लाखांवर भाविक आदिमायेचरणी नतमस्तक झाले. रविवार सुटीचा दिवस व ललिता पंचमीचा मुहूर्त साधत गडावर भाविकांची उच्चांकी गर्दी झाली. गर्दीमुळे गडाकडे येणारे सर्व रस्ते एसटी बस, खासगी वाहने व पदयात्रेकरूंच्या गर्दीने ओसंडून वाहत होते.

वणी - सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवातील ललिता पंचमीनिमित्त भाविकांचा महापूर लोटला. सुमारे अडीच लाखांवर भाविक आदिमायेचरणी नतमस्तक झाले. रविवार सुटीचा दिवस व ललिता पंचमीचा मुहूर्त साधत गडावर भाविकांची उच्चांकी गर्दी झाली. गर्दीमुळे गडाकडे येणारे सर्व रस्ते एसटी बस, खासगी वाहने व पदयात्रेकरूंच्या गर्दीने ओसंडून वाहत होते.

सकाळी सहापासूनच मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी बाऱ्या लागल्या होत्या. त्यानंतर भाविकांच्या गर्दीत वाढ होत जाऊन सकाळी नऊला भाविकांच्या बाऱ्या पहिल्या पायरीपर्यंत पोचल्या. सकाळी अकारानंतर गर्दीत वाढ होत गेल्याने पाटील चौकापर्यंत बाऱ्या लागल्या होत्या. ही स्थिती सायंकाळी उशिरापर्यंत कायम होती. भाविकांची गर्दी लक्षात घेता चेंगराचेंगरीचे प्रकार टाळण्यासाठी भाविकांना पहिली पायरी ते मंदिर यादरम्यान ठिकठिकाणी बाऱ्या लावून टप्प्याटप्प्याने मंदिरात सोडण्यात येत होते. एका मिनिटात सर्वसाधारण ५० भाविक दर्शन घेऊन बाहेर पडतील, अशी व्यवस्था न्यासातर्फे करण्यात आली होती. 

दरम्यान,  पंचामृत महापूजा न्यासाचे विश्‍वस्त ॲड. अविनाश भिडे, राष्ट्रवादीचे नेते सुनील बागूल यांनी कुटुंबीयांसमवेत केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मृदुला भाटकर, अभिनेते रमेश भाटकर यांनीही देवीचरणी हजेरी लावली. नांदुरी येथे खासगी वाहनांनी भाविक मोठ्या संख्येने आल्यामुळे नांदुरी येथील पार्किंगचे सर्व मैदान फुल झाले होते. तसेच नांदुरी बसस्थानक ते कळवण रस्ता अशा दोन ते अडीच किलोमीटर रस्त्याच्या दुर्तफा खासगी वाहनांच्या पार्किंगमुळे काही काळ वाहतुकीची कोंडी होत होती. वणी ते नाशिक रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आदेशास सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची दुरवस्था कायम असल्यामुळे गडावर येणारी वाहने संथगतीने धावत होती, तर काही ठिकाणी वाहतूक विस्कळित होत होती. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या गडावर एकमेव असलेल्या एटीएम केंद्राची सेवा नेहमीप्रमाणे बंदच असल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे.

याबाबत सप्तशृंगीदेवी न्यास व ग्रामपंचायतीने वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही दखल घेतली जात नसल्याने भाविक व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या वेळी कळवणचे न्यायाधीश देवरे, स्वरा पारखी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे उपस्थित होते.

प्रशासकीय यंत्रणांची दमछाक
गर्दीचा महापूर लोटल्याने नांदुरी ते सप्तशृंगगडदरम्यान दर पाच मिनिटांच्या अंतराने एक बस याप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले होते. नाशिक सीबीएस, निमाणी, नाशिक रोड येथूनही गडावर जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन थेट गडावर दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराने बस सोडण्यात आल्या होत्या. तसेच जिल्ह्यातील इतर आगारांतूनही बस सोडण्यात येत असल्याने नांदुरी ते सप्तशृंगगड यादरम्यान बसच्या रांगाच लागल्या होत्या. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून गडावर भाविकांची गर्दी मर्यादित होती. त्यामुळे गडावरील प्रशासकीय यंत्रणा निश्‍चिंत होती. मात्र, भाविकांची अनपेक्षित गर्दी उसळल्याने प्रशासकीय यंत्रणांची दमछाक होत होती. गर्दीमुळे गडावरील व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. 

Web Title: malegaon news navratri