दहा चिमुकल्यांच्या शिक्षणाचा तनिष्का भगिनींनी उचलला भार 

दहा चिमुकल्यांच्या शिक्षणाचा तनिष्का भगिनींनी उचलला भार 

मालेगाव - अजंग- दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहीर तलावात शेतमजूर महिलांचा ट्रॅक्‍टर उलटल्याने सात महिलांना आपले प्राण गमवावे लागले. त्यापैकी पाच महिलांची चिमणी-पाखरे उघड्यावर आली आहेत. त्यांना दाणा भरविणारी माता या दुर्घटनेत बळी गेल्याने ही मुले सैरभैर झाली आहेत. कालांतराने त्यांना मदत मिळेलही; मातृछत्र हरपलेल्या वडेल येथील या दहा चिमुकल्यांचा शैक्षणिक खर्चाचा भार ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या शिक्षक फोरमने उचलला आहे. 

सामाजिक बांधिलकीतून तनिष्कांमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. नैसर्गिक आपत्ती वा दुर्घटना घडल्यास तनिष्का मदतीसाठी धावून जातात. याची प्रचिती पुन्हा वडेलच्या दुर्घटनेनंतर आली आहे. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी रोजीरोटीची लढाई लढणाऱ्या सात शेतमजूर महिलांचा बळी गेला. यातील मृत झालेल्या उषाबाई भदाणे यांची मुले दीपाली (दुसरी), दिव्या, नीलेश (बालवाडी), रंजना महाले यांचा मुलगा जयदेव (अकरावी), संगीता महाजन यांची मुले आशिष (अकरावी), गायत्री (आठवी), संगीता भदाणे यांची ओम (दुसरी), साई (पहिली), रोहिणी शेलार यांचे अनिता (आठवी), अमर (पाचवी) अशा दहा चिमुकल्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी तनिष्का व्यासपीठाच्या शिक्षक फोरमच्या मालेगावप्रमुख प्रतिभा अहिरे व सदस्यांनी घेतली आहे.

 मालेगाव शहर तनिष्का प्रतिनिधी नीलिमा पाटील व तनिष्का सदस्यांनी आज सकाळी सामान्य रुग्णालयात जाऊन दुर्घटनेतील जखमी महिलांची विचारपूस केली. या वेळी महिला रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तनिष्का सदस्यांनी धीर दिल्याने मायेचा आधार मिळाल्याची भावना वंदना सोनवणे, ताईबाई मांडवडे यांनी व्यक्त केली. या वेळी सौ. अहिरे, प्रतिभा पवार, नयना चौधरी, कल्पना सूर्यवंशी, कुसुम बच्छाव आदींसह सदस्या उपस्थित होत्या.

अजंग शिवारातील दुर्घटना मनाला चटका लावून गेली. घरातील कर्त्या महिलेचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाचीच वाताहत होते. समाजातील दानशुरांनी अशा कुटुंबीयांना मदतीसाठी पुढाकार घ्यावा. 
- नीलिमा पाटील, तनिष्का सदस्या, मालेगाव तालुका 

या दुर्घटनेच्या वार्ताने संपूर्ण तालुका ढवळून निघाला. रोजीरोटीची लढाई लढणाऱ्या महिलांचे प्राण गेल्याने समाजमन हेलावले. मातृछत्र हरपलेल्या दहा चिमुकल्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी आम्ही घेत आहोत. ‘सकाळ’च्या प्रेरणेतून हे बळ मिळाले. 
- प्रतिभा अहिरे, प्रमुख, तनिष्का व्यासपीठ शिक्षक फोरम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com