खंडेराव- बानूबाईच्या चंदनपुरीत दारूबंदी

प्रमोद सावंत
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

मालेगाव - "खंडेरायाच्या स्वागताला चंदनपुरी सजली, बानूबाईच्या रणरागिणींनी कंबर कसली, अन्‌ बाटली फुटली, अन्‌ बाई बाटली फुटली...' हाच भाव चंदनपुरीसह जिल्ह्यातील प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर होता. खंडेराव - बानूबाईच्या श्रीक्षेत्र चंदनपुरीत आज दारूबंदीसाठी झालेल्या मतदानात बाटली आडवी झाली. एकूण झालेल्या एक हजार 237 मतदानापैकी आडव्या बाटलीला एक हजार 111 महिलांनी कौल दिला. उभ्या बाटलीसाठी अवघी 69 मते पडली. 57 मते अवैध ठरली. नाशिक जिल्ह्यातील ही दुसरी ऐतिहासिक घटना आहे. यापूर्वी लखमापूर (ता. दिंडोरी) येथे बाटली आडवी झाली होती. या मतदानानंतर जिल्ह्यातील महिलांना दारूबंदीसाठी प्रेरणा मिळणार आहे. चंदनपुरी परिसरात दोन देशी-विदेशी व 14 बार, अशी 16 दुकाने आहेत.

आजच्या या ऐतिहासिक घटनेत बाणाईच्या रणरागिणींचा मोठा विजय झाला. या विजयाला सरपंच योगिता अहिरे-पाटील, उपसरपंच रोशना सोनवणे, तनिष्का मालेगाव शहर प्रतिनिधी नीलिमा पाटील, दिंडोरी येथील प्रतिनिधी ज्योती देशमुख, चंदनपुरी येथील तरुणी, महिला, युवक, ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला. चंदनपुरी येथे एकूण दोन हजार 91 महिला मतदानासाठी पात्र होत्या. एकूण मतदानापैकी 50 टक्‍क्‍यांहून अधिक मते पडल्यास बाटली आडवी होणार होती. काही विक्रेत्यांनी मतदानाला प्रतिसाद मिळू नये यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. सकाळी पहिल्या टप्प्यात मतदानासाठी मोठा उत्साह होता. दुपारी मतदानाची गती थोडी संथ झाली. शेवटच्या एक तासात मतदान कमी झाल्याने महिलांना थोडी चिंता होती. मात्र, खंडेराव व बाणाईचा आशीर्वाद मिळेल. कौल आपल्या बाजूने लागेल, याची खात्री असल्याने महिला निश्‍चिंत होत्या. निकालात त्याची परिणती आली. महिलांच्या परिश्रमाचे चीज झाले. त्यांना युवकांच्या सहकार्याची जोड मिळाली.