मालेगावचा पारा 42.6 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मालेगाव - शहर व परिसरातील तापमानात आज गेल्या आठवड्याच्या तुलनेत मोठी वाढ झाली. आज येथे 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काल 40.8 अंश सेल्सिअस तापमान होते. तुलनेने पारा अचानक वाढल्याने अनेकांना अतिसाराचा त्रास जाणवत आहे. सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या अलिअकबर, वाडिया रुग्णालयात दीडशेहून अधिक अतिसाराचे रुग्ण दाखल झाले आहेत. महापालिकेने अतिसाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू केला आहे. वाढत्या तापमानामुळे उलटी, जुलाब याचा बहुसंख्य रुग्णांना त्रास होत आहे. शिळे, उघड्यावरील अन्न, अशुद्ध पाणी यामुळे पूर्व भागातून मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत.

सामान्य रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात 50 पेक्षा अधिक रुग्ण; तर महापालिकेच्या विविध रुग्णालयांत 100हून अधिक रुग्ण दाखल आहेत.

Web Title: malegav temperature 42.6 degree