गावठी दारुविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा 

illegal liquor
illegal liquor

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील पोलिसांनी अनधिकृतरीत्या गावठी दारु विक्रेत्यांवर उगारलेला कारवाईचा बडगा सुरूच ठेवला आहे. यामुळे बहुतांश गावांमध्ये दारु विक्री बंद करण्यात काही प्रमाणात यश आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गावठी दारुमुळे गोरगरिबांचे संसार उद्‌ध्वस्त होत असल्याने यापुढेही कारवाया सुरूच राहणार आहेत. दोन वर्षांत 140 कारवाया करुन सुमारे 15 लाख 78 हजार 334 रुपयांचे कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. 

येथील पोलिस ठाण्यांतर्गत जवळपास 55 खेडी येतात. यापैकी बऱ्याच गावांमध्ये खुलेआम गावठी दारु विक्री सुरु आहे. यातील काही गावांनी दारूबंदीचे ठराव देखील केले आहेत. मात्र, त्याची प्रशासनातर्फे अंमलबजावणी होत नसल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वास्तविक, गावागावातील अनधिकृतरीत्या होणाऱ्या गावठी दारूच्या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दखल घेतली पाहिजे. मात्र, या विभागाकडून आजपर्यंत पाहिजे तशा ठोस कारवाया न झाल्यामुळे स्थानिक पोलिसांनीच कारवाया सुरु केल्या आहेत. 

मेहुणबारे पोलिसांनी दोन वर्षांत परिसरातील 25 गावांमध्ये धडक देऊन सुमारे 53 हजार 255 लिटर कच्चे रसायन जप्त करून जागेवरच नष्ट केले आहे. 2016 मध्ये 24 हजार 335 लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले होते. याशिवाय 670 लिटर तयार दारू, 219 क्वार्टर, 15 बिअर असा एकूण 10 लाख 29 हजार 988 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या वर्षांत 56 कारवाया करुन 28 हजार 920 लिटर कच्चे रसायन तसेच 1 हजार 966 लिटर तयार दारू, 282 क्वार्टर, 123 बिअर असा एकूण 5 लाख 48 हजार 346 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाया होऊनही अद्याप गावठी दारु विक्री पूर्णपणे बंद झालेली नाही. त्यामुळे अजूनही ज्या गावांमध्ये खुलेआम गावठी दारू विकली जाते, अशा ठिकाणीही कारवाई करी, अशी मागणी होत आहे. 

काही दिवसांपूर्वी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी गावागावात तरुणांच्या बैठका घेऊन शांतता राखण्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते. त्याचा चांगला परिणामही दिसून आला. विशेषतः गावठी दारु विक्रीच्या संदर्भात तरुणांनीच पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन बऱ्याच कारवाया झाल्या आहेत. तरुणांनी आपले गाव व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. शिरसाठ यांनी केले आहे. 

ग्रामीण भागात गावठी दारूच्या कारवाया होत असल्या तरी अजूनही बऱ्याच गावांमध्ये सुरु असलेले सट्टा, मटका, जुगारासारखे अवैध धंदे पूर्णपणे बंद झालेले नाहीत. या संदर्भात पोलिसांच्या कारवाया सुरूच आहेत. त्यामुळे छुप्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत पोलिसांना माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून अवैध धंदेवाल्यांवर त्वरित कारवाई केली जाईल. यासाठी गावागावातील तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

धामणगाव, खडकीसीम, तळोंदा, शिरसगाव, टाकळी प्र. दे. या गावांमध्ये दारूबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे या गावाचा आदर्श इतर गावातील ग्रामस्थांनी देखील घ्यावा व आपले दारूबंदी करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com