चांदवड पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात शस्‍त्रसाठा हस्तगत

Chandwad
Chandwad

चांदवड : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे जाणा-या बोलेरो गाडीतून गुरुवारी (ता.१४) रात्री ८च्या सुमारास चांदवड टोलनाक्‍याजवळ तपासासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनातून मोठ्या प्रमाणात शस्‍त्रसाठा जप्‍त करण्‍यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना ताब्‍यात घेतले असून त्‍यांच्‍याकडून २५ रायफल, १७ रिव्हॉलवर, २ विदेशी पिस्तुल, ४१४६ जिवंत काडतुसे यांसह मुद्देमाल जप्त करण्‍यात आला आहे. 

दरम्यान गुरुवारी  संध्‍याकाळच्या सुमारास मुंगसे (ता. मालेगाव) शिवारातील पेट्रोलपंपावर सिल्व्हर रंगाच्या बोलेरो जीपने (क्र.- एम एच ०१ एस.ए.७४६०) डिझेल भरले. मात्र डिझेलचे पैसे न देताच पिस्तुलचा धाक दाखवत गाडीत असलेल्या तिघांनी पंपावरुन चांदवडच्या दिशेने गाडी भरधाव वेगाने घेऊन पोबारा केला. या घडल्या प्रकाराबाबत पंपचालकाने मालेगाव पोलिसांना त्वरित माहिती दिल्याने पोलिसांनी तातडीने सूत्रे हालवत चांदवड पोलिसांशी संपर्क केल्याने पोलीसांनी शहराजवळ असलेल्या सोमा टोलनाक्यावर (क्र. एम एच ०१ एस.ए.७४६०) क्रमांकाची सिल्व्हर रंगाची बोलेरो ताब्यात घेतली असता वाहनात असलेल्या तिघा व्यक्तींची तपासाअंती त्यांच्याकडे दोन पिस्तुल मिळून आल्याने चांदवड पोलिसांचा संशय बळावल्याने तिघांची व वाहनाची कसून चौकशी केली. बोलेरो गाडीच्या छताला गॅसकटरच्या साह्याने कापून छताला एक मोठा कप्पा तयार करण्यात आलेला होता त्या कप्यातून २५ लहान मोठी रायफल्स असून त्यात कायद्याने मनाई केलेली पंप अॅक्शन मशीनगन, १७ रिव्हॉलवर, २ विदेशी पिस्तुल, ४१४६ जिवंत काडतुसे असा मोठा शस्‍त्रसाठा तर दोन मोबाईल फोन, एक घड्याळ, एक गॅसकटर, एक लोखंडी कटावणी, लहान मोठे पाने असलेला सेट, मोठी हतोडी, रोख १८ हजार २०० रुपये व दोन लाख किमतीच्या बोलेरो गाडीसह ताब्यात घेण्यात आले आहे. 

चांदवड पोलिसांनी आरोपी नागेश राजेंद्र बनसोडे (वय-२३, रा. वडाळा, ता. जि. नाशिक), सलमान अमानुल्‍ला खान (वय-१९, रा. शिवडी मच्‍छी गोडावून, मुंबई), बद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत सुका (वय-२७,रा. शिवडी, मुंबर्इ) अशी आरोपींचे नावे आहेत. त्‍यांच्‍यावर भारतीय हत्‍यार कायद्याचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून आज शुक्रवारी या तिघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपींनी एवढा मोठा शस्‍त्रसाठा कोठून आणला, कोठे घेऊन जाणार होते त्यांचा देशात कोठे मोठा घातपात करण्याचा कट होता का असे अनेक प्रश्न पोलीस तसेच सर्वसामान्यांच्या मनात घर करून असल्याने या संदर्भात महाराष्ट्र पोलीस यंत्रणेच्या सर्वच विभागांची धांदल उडाली असून या प्रकारचे धागेदोरे नेमके कोठून फिरतायत यासाठी पोलीस यंत्रणेचा तपास सुरु आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच चांदवड पोलीस ठाण्यास भेट देत घडल्या प्रकारची माहिती घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com