वृक्षतोडीने सातपुडा होतोय बोडका

सुनील पाटील
सोमवार, 28 मे 2018

चोपडा : सातपुडा पर्वत रांगांची तालुक्‍यास किनार लाभली आहे. एकेकाळी सौंदर्याने नटलेला व वैभव असलेला सातपुडा मात्र, गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण, वणवा व सर्रास वृक्षतोडीने बोडका होत आहे. वाचविण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. 

चोपडा : सातपुडा पर्वत रांगांची तालुक्‍यास किनार लाभली आहे. एकेकाळी सौंदर्याने नटलेला व वैभव असलेला सातपुडा मात्र, गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण, वणवा व सर्रास वृक्षतोडीने बोडका होत आहे. वाचविण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. 
निसर्गाचे, वन्यजीवांचे, पर्यावरणाचे जतन होण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीची खरी गरज आहे. दिवसाढवळ्या अनेक तोडलेले वृक्ष ट्रॅक्‍टरमध्ये भरून जात असताना दिसून येतात. याबाबत आमदारांनी नुकत्याच झालेल्या आमसभेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आपण काय करीत आहात? कुणाच्या आशीर्वादाने सातपुडा बोडका करीत आहेत? असा सवाल केला असता वनविभागाचे अधिकारी निरुत्तर झाले. मार्गावरील हिरवेगार झाडांची सर्रास कत्तल होत असून, ती रेकॉर्डवर कोरडी झाडे दाखवली जातात. झाडांच्या बुंध्यास आगी लावण्याचेही प्रकार वाढले आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सातपुड्याच्या जंगलात साग, अंजन, निंब, बेहडा, शिसम, पळस अशा वृक्षांचे प्रकार आढळून येतात. हिरवीगार वनराईने नटलेला या सातपुडयात आज शोधूनही डेरेदार वृक्ष आढळून येत नाही. सातपुडा पूर्णतः बोडका होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्‍यातील वनक्षेत्र चार विभागात विभागले आहे. यात कर्जाणा, वैजापूर, चोपडा, देवझीरी असे भाग असून हे चारही भाग 45 हजार हेक्‍टर क्षेत्रात विखुरलेले आहे. पर्यावरण संतुलनसाठी 33 टक्के झाडे जंगलात असणे गरजेचे आहे. 

सद्यःस्थितीतील वृक्षांची स्थिती 
कर्जाणा : 3 लाख 50 हजार (14 हजार हेक्‍टर) 
वैजापूर : 2 लाख 41 हजार (10 हजार 500 हेक्‍टर) 
चोपडा : 2 लाख 50 हजार (10 हजार 500 हेक्‍टर) 
देवझीरी : 4 लाख 50 हजार (10 हजार हेक्‍टर). 

ही आहेत प्रमुख कारणे.. 
वनहक्क कायद्यांन्वये विविध संघटना, वनहक्क समित्या यांच्यातर्फे जंगलातील जमिनी दिल्या जात आहेत. फक्त डोंगराळ भाग काही प्रमाणात सुरक्षित आहे. सपाटीचा भाग अतिक्रमित होत आहे. वनहक्क कायद्यात फेरबदल करणे गरजेचे आहे. जंगलास आग लावण्याचे प्रकार वाढत आहेत. वणवा पेटल्याने हजारो हेक्‍टर जंगल नष्ट होत आहे. वणवा विझविण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. चोरटी वृक्ष तोड यामुळे ही जंगल नष्ट होत आहे. वनकायद्यात दुरुस्ती करावी. यात निसर्गाचा, वन्यजीवांचाही विचार व्हावा.

Web Title: marathi news chopda tree cutting satpuda