सैन्यात नोकरीच्या आमिषाने तरुणांना कोट्यवधींचा गंडा 

सैन्यात नोकरीच्या आमिषाने तरुणांना कोट्यवधींचा गंडा 

पाचोरा - सैन्यदलात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून उत्तर महाराष्ट्रासह पश्‍चिम महाराष्ट्रातील शेकडो बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या सैन्यदलातील सुभेदारास पाचोरा पोलिसांनी नगर येथून आज अटक केली. त्यासह पत्नी व मुलालाही पोलिसांनी अटक केली असून, विविध भागांतील तरुणांकडून सात कोटी रुपये उकळल्याची कबुली या सुभेदाराने दिली आहे. 

प्राप्त माहितीनुसार वाळकी (ता. नगर) येथे वजीर बंगल्यात वास्तव्य करणारा हसनोद्दीन चॉंदभाई शेख हा 1988 पासून सैन्यदलात आहे. मिझोराम राज्यातील तवांग येथे सुभेदार पदावर तो सध्या कार्यरत आहे. त्याने 2012 राज्यभरातील बेरोजगार तरुणांना नोकरीच्या आमिषाने गंडविण्याचा "उद्योग' सुरू केला. त्यासाठी काही एजंट नेमून तरुणांकडून प्रत्येकी सात लाखांची रक्कम त्याने उकळली. सध्या त्याने सात कोटींपर्यंतची रक्कम उकळल्याची कबुली दिली असली, तरी हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता असून, त्याच्यासह मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यताही पोलिसांनी वर्तवली आहे. 

वर्दीत फिरून गोरखधंदा 
संशयित हसनोद्दीन याने सैन्यदलातील सुभेदाराच्या वर्दीत राज्यभर फिरून तरुणांना नोकरीचे आमिष दाखवले. "सैन्य दलातील सर्वच वरिष्ठ अधिकारी माझे मित्र आहेत. त्यांच्या वतीने मी तुम्हाला चांगल्या पदाची नोकरी मिळवून देतो,' असे आमिष दाखवत काहींना त्याने बनावट ऑर्डरही दिल्या. काही तरुण मिळालेल्या ऑर्डरच्या आधारे नोकरी जॉईन करण्यासाठी ऑर्डरवर नमूद केलेल्या कार्यालयात गेले असता, तेथे उपस्थित राहून या ठकसेनने वेगवेगळी कारणे सांगून दिलेली ऑर्डर परत घेतली व तुम्हाला दुसरी ऑर्डर देतो, तुम्ही त्या दुसऱ्या कार्यालयात जाऊन रुजू व्हा, असे सांगून संबंधित तरुणांची दिशाभूल केली. 

गंडविलेल्या तरुणांना मारहाण 
लाखो रुपये देऊनही आपल्याला नोकरी मिळत नाही, हे पाहून काही तरुण संशयित सुभेदार हसनोद्दीन शेखच्या नगर येथील निवासस्थानी गेले. मात्र, त्या ठिकाणी त्याने या गंडवलेल्या तरुणांना बंदुकीचा धाक दाखवून, तर काहींना घरात दोरखंडाने बांधून मारहाण केल्याची व्यथा तरुणांनी पाचोरा पोलिसांसमोर कथन केली. हा ठकसेन येत्या 31 मे रोजी निवृत्त होत असून, तो सध्या सैन्यदलाच्या इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये नियुक्तीस आहे. 

सैन्यातील अधिकारीही गोत्यात 
तरुणांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या संशयित हसनोद्दीन याने सैन्यदलातील माने नाईक व वोरा यांच्या सांगण्यावरून आपण हा प्रकार केला व त्यात अडकलो, असे तपासाधिकारी पोलिस निरीक्षक श्‍यामकांत सोमवंशी यांना सांगितले. त्यामुळे या प्रकरणात सैन्यदलातील नेमके किती व कोणते अधिकारी अडकले आहेत, याकडे पुढील तपासाची सूत्रे वळणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com