महाजन अक्कल शिकवणार का? : आमदार गोटेंची प्रखर टीका 

महाजन अक्कल शिकवणार का? : आमदार गोटेंची प्रखर टीका 

धुळे ः शहरात सलग दोनदा अपक्ष आमदार आणि आता भाजपचा आमदार म्हणून कार्यरत असलेला लोकप्रतिनिधी असताना त्याला बाजूला सारून बाहेरून एखाद्या मंत्र्याला पाठविणे आणि तो येथे येऊन आता आम्हाला निवडणूक लढविण्याची अक्कल शिकवणार?, अशा शब्दात आमदार अनिल गोटे यांनी आज पुन्हा पत्रकाव्दारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर प्रखर टीकेचा प्रहार केला. 
 
आमदार गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे, की शहर गुंडगिरी मुक्त करायचे असेल आणि गरीब, सामान्यांना निर्भयतेने जगण्याची हमी मिळवून द्यायची असेल तर या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मला कठोर निर्णय घेणे अपरिहार्य आहे. एखाद्या ठिकाणी भाजप पक्षाने निरीक्षक पाठविणे समजू शकतो. पक्षाचे अस्तित्व नाही, जनसामान्यात स्थान नाही, अशा ठिकाणी निरीक्षक पाठविणे अपेक्षित आहे. मात्र, येथील स्थिती वेगळी आहे. 
माझा संघर्ष हा केवळ जुन्या, आयात बरबटलेल्यांविरुध्द मर्यादित नाही तर, शहरात आमूलाग्र परिवर्तन घडविण्यासाठी आहे. चांगले उमेदवार दिले नाही तर महापालिकेचा कारभार सुधारणार तरी कसा? 
त्याच- त्याच व्यक्तींना पक्ष बदलून उमेदवारी दिल्यावर त्यांच्या मनोवृत्तीत बदल होईल तरी कसा? 
 
कार्यकर्त्यांना वाटा मिळावा 
गुंड, बदमाश, आंगुठेछाप, वाळू, भूखंड व रॉकेल माफिया, खंडणीखोर तीस वर्षांत बदलले नाहीत. त्यांना हटविणार कसे? भाजपमध्ये 25 ते 30 वर्षे काम केल्यानंतरही जुने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांऐवजी केवळ धनवल्लभांना प्रतिष्ठा, पद मिळणार असेल तर लहान कार्यकर्त्यांना संधी तरी कशी व कधी मिळेल? पक्षाची कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांना सत्तेचा थोडा का होईना वाटा मिळाला पाहिजे. नेत्यांना हे कळत नसेल तर पक्षावर श्रद्धा, निष्ठा आणि पक्ष नेतृत्वावर अनन्यसाधारण विश्वास असलेल्या समजदार कार्यकर्त्यांनी पक्षहितासाठी योग्य तो निर्णय घेणे आवश्‍यक आहे. पिठावर रेगोट्या मारणाऱ्या नेत्यांना त्याचे गांभीर्य कळू शकत नाही. रात्री- अपरात्री पक्षासाठी धावून येणाऱ्या कार्यकर्त्यांना आता जर न्याय मिळणार नसेल तर तो जन्मात कधीच मिळू शकणार नाही. वाईटाविरूध्द माझा संघर्ष असून महापालिकेवर आपला कुंकू लागला पाहिजे. त्यासाठी कुणाशीही तडजोड मंजूर नाही, असे आमदार गोटे यांनी पत्रकात नमूद केले. 
 
"ते' पूर्वी नवखेच... 
महापालिकेच्या पंधरा वर्षाच्या सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपचे महापौर आले तसे गेले. पण कुणालाही स्वतःच्या कल्पनेप्रमाणे काम करता आलेले नाही. ज्या नगरसेवकांनी महापालिकेत पंधरा ते वीस वर्षे काम केले तेही कधी तरी नवखे होते ना, असेही आमदार गोटे यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com