बिबट्याला जेरबंद करणारा पोलिस शिपाई विनोद पाठक.!

प्रा. भगवान जगदाळे
रविवार, 14 जानेवारी 2018

सदर बिबट्या नर असून त्याच्यासोबत असणारा अजून एक बिबट्या मात्र पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. श्री. पाठक यांनी यापूर्वी ठाणे जिल्ह्यात नऊ वर्षे पोलिसाची नोकरी केली असून आठ महिन्यांपासून ते निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून ते मूळचे मोहाडी येथील रहिवासी आहेत.

निजामपूर-जैताणे (धुळे) : गेल्या अनेक दिवसांपासून साक्री तालुक्यासह माळमाथा परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जामकी (ता.साक्री) शिवारात पोलिस शिपाई विनोद पाठक यांनी जीवाची बाजी लावून बिबट्याला जेरबंद केले. त्यांच्यासह ही कामगिरी करणाऱ्या निजामपूर पोलिस ठाण्याच्या व वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आज सकाळी साडेनऊच्या सुमारास वासखेडी, जामकी व नागझिरी परिसरातील काही ग्रामस्थांना बिबट्या आढळून आला. ग्रामस्थांनी ताबडतोब निजामपूर पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे ही माहिती कळविली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. सुरुवातीला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यापैकी एक कर्मचारी जखमीही झाला. त्यानंतर पोलीस कर्मचारी विनोद पाठक सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक कौतिक सुरवाडे, हवालदार शिंदे, कर्मचारी हरीश पाटील, संदीप ठाकरे, चालक श्री. कुंभार आदींचा समावेश होता. सुरुवातीस झुडुपाआड लपलेल्या बिबट्याने विनोद पाठक यांच्या अंगावर दोनदा झडप घातली. तिसऱ्यांदा मात्र ठीक अकरा,साडेअकराच्या सुमारास श्री.पाठक यांनीच बिबट्यावर झडप घालून मोठ्या हिमतीने त्याला जेरबंद केले. त्यांनतर इतर कर्मचारीही त्यांच्या मदतीला धावून आले. बिबट्याला बांधून गोणपाटात टाकण्यात आले. मग खुद्द पाठक यांनीच बिबट्याला पिंजऱ्यात कोंडून वनविभागाच्या स्वाधीन केले. या झटापटीत पाठक हे किरकोळ जखमीही झाले आहेत. दिवसभर माळमाथा परिसरातील ग्रामस्थांमध्ये श्री. पाठक यांच्याच शौर्याचे कौतुक होत होते. दरम्यान डॉ. महेश ठाकरे, पंढरीनाथ सोनवणे आदींसह त्यांच्या मित्रपरिवाराने अनुक्रमे रुग्णालय व पतसंस्थेतर्फे श्री. पाठक यांचा सत्कार केला.

याबाबत पाठक यांच्याशी संपर्क साधला असता सदर बिबट्या नर असून त्याच्यासोबत असणारा अजून एक बिबट्या मात्र पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. श्री. पाठक यांनी यापूर्वी ठाणे जिल्ह्यात नऊ वर्षे पोलिसाची नोकरी केली असून आठ महिन्यांपासून ते निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून ते मूळचे मोहाडी येथील रहिवासी आहेत. कुस्ती, बॉक्सिंग, स्विमिंग यात ते पारंगत आहेत. माळमाथा परिसरातील उभरांडी, रोजगाव, भामेर, खुडाणे, नवागाव, वासखेडी, जामकी, नागझिरी आदी गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. विनोद पाठक यांनी केलेल्या कामगिरीमुळे काही अंशी भीती निवळली आहे. पण अजूनही एक बिबट्या पसार झाल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने यापूर्वी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या गायी, म्हशी, वासरू, बैल, शेळ्या, मेंढ्यांना फस्त केले असून ग्रामस्थांवरही हल्ले केले आहेत. साक्री, म्हसदी, दहीवेल, पिंपळनेर परिसरातही याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे...

Web Title: Marathi news Dhule news Police employee captured leopard