शिक्षक संघटनांमधील वादात राजकीय पक्षांचा धुरळा

शिक्षक संघटनांमधील वादात राजकीय पक्षांचा धुरळा

धुळे ः शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीवरून संघटनांमध्ये मतभेद झाले आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीचा लाभ उठविण्यासाठी सत्ताधारी, विरोधक आता शक्तीनिशी रिंगणात उतरले आहेत. यात प्रमुख राजकीय नेत्यांनी उडी घेतल्यामुळे रंगत वाढल्याचे दिसत असले तरी ही निवडणूक नेहमीच्या वळणावर चालली असल्याचा प्रत्यय मतदारांना येत आहे. 
विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, टीडीएफ आणि शिक्षक, अशी चौरंगी लढत होत आहे. थेट मंत्रालय आणि "मातोश्री'वरून सूत्रे हलविली जात असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत आहे. 

"टीडीएफ'मध्ये कुरघोडीचे राजकारण 
उमेदवार निवडीवरून शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) संघटनेत मतभेद निर्माण झाले. प्रा. संदीप बेडसे, भाऊसाहेब कचरे, शालिग्राम भिरुड, अमृत शिंदे असे चार उमेदवार "टीडीएफ'चे असल्याचे सांगत प्रचार करीत आहेत. प्रा. बेडसे यांनी "टीडीएफ'चा अधिकृत उमेदवार असल्याच्या मुद्द्यावर प्रचारात जोर दिला आहे. या संघटनेचे माजी आमदार, गेल्या निवडणुकीतील उमेदवारांना सोबत घेत प्रा. बेडसे यांनी संघटनेतील इतर स्पर्धक उमेदवारांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास प्रचारातील वेगवेगळ्या मुद्द्यांतून शह देण्याचा प्रयत्न स्पर्धक उमेदवार करीत आहेत. 

भाजप-"आरएसएस'मध्ये दुरावा 
एरवी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उमेदवार द्यावा आणि त्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेल्या शिक्षक परिषदेने मदत करावी, तर याउलट शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक परिषदेने उमेदवार द्यावा आणि त्यास भाजपने मदत करावी, असा अलिखित प्रघात या पक्ष- संघटनेत होता. तो यंदाच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोडीत निघाला. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिक्षक परिषदेअंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. यातून शिक्षक परिषदेतर्फे सुनील पंडित यांनीही बंडखोरी केली आहे. 

भाजप- शिवसेना आमनेसामने 
रचनात्मक कार्य करणाऱ्या शिक्षक संघटनांमध्ये मतभेद झाल्याचे पाहून भाजप, शिवसेना, कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर काही पक्ष या स्थितीचा राजकीय लाभ उठविण्यासाठी पुढे आले आहेत. या निवडणुकीत प्रथमच सत्ताधारी भाजपने माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे पुत्र अनिकेत पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिल्याने सत्ताधारी शिवसेनेने येवल्यातून विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपकडून उमेदवारीसाठी दावा करणारे माजी खासदार व माजी पदवीधर आमदार प्रताप सोनवणे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी माघार घ्यावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत रस घेतल्याचे पाहून "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी दोन वेळा बैठका घेत दराडे यांच्या विजयासाठी काम करावे, अशी सूचना दिल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. 

कॉंग्रेस आघाडीचा पाठिंबा 
भाजप, शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते "फ्रंट'वर आले असून, त्यांनी "टीडीएफ'चे उमेदवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी धुळे जिल्हाध्यक्ष प्रा. संदीप बेडसे यांना पाठिंबा जाहीर केला. या प्रमुख पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मेळावे सुरू केले आहेत. 

प्रचारात आजी- माजी मंत्र्यांची फौज 
सत्ताधारी भाजपतर्फे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, माजी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, शिवसेनेतर्फे ग्रामीण विकास राज्यमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, तसेच कॉंग्रेसतर्फे माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी कामगार राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख आदींसह सत्ताधारी, विरोधी गटाचे आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, पक्षीय पदाधिकारी प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे शिक्षक निवडणुकीत राजकीय धुरळा उडाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com