भाजप, शिवसेनेच्या स्वबळाची लोकसभेसाठी चाचणी 

भाजप, शिवसेनेच्या स्वबळाची लोकसभेसाठी चाचणी 

जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे हे दोघे आपापल्या पक्षांचे नेतृत्व करीत आहेत. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही पक्षांनी जोर लावला आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्ता कायम राखण्याची अपेक्षा आहे, तर भारतीय जनता पक्षाचा महापालिकेवर यावेळी पक्षाचा झेंडा फडकाण्याचा दावा आहे. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आघाडी सत्तेत "किंगमेकर' बनण्याच्या आशेवर आहे. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढण्याची, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, सपा आघाडीने लढल्यास किती यश मिळणार, याचीच ही चाचणीही आहे. 
जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी-समाजवादी पक्षाची आघाडी मैदानात आहेत. भाजपने सर्व 75, तर शिवसेनेने 70 जागा लढविल्या असून, पाच जागा पुरस्कृत केल्या आहेत. कॉंग्रेसने 17, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 42 व समाजवादी पक्षाने 6 जागा लढविल्या आहेत. याशिवाय "एमआयएम'ने सहा जागा लढविल्या आहेत. अपक्ष व इतर पक्षासह एकूण 303 उमेदवार मैदानात आहेत. "मनसे' आणि "आप'ने निवडणुकीत आपले उमेदवार यावेळी उभे केलेले नाहीत. 

प्रचारात पक्षांनी लावला जोर 
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातच अतीतटीचा सामना होणार आहे. दोन्ही पक्ष आता जोरदार प्रचार करीत आहेत. भाजपतर्फे प्रचारासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ठिय्या मांडला आहे. शिवाय माजी मंत्री एकनाथ खडसे हेसुद्धा प्रचारात उतरले आहेत. पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच खासदार ए. टी. पाटील,आमदार सुरेश भाळे, आमदार चंद्रकांत पाटील, स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उदय वाघ प्रचारात उतरले आहेत. तर शिवसेनेतर्फे माजी मंत्री सुरेशदादा जैन नेतृत्व करीत असून सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजीआमदार आर.ओ.पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे हे स्थानिक नेते प्रचारात आहेत. शिवाय सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जळगावात ठाण मांडून या शिवाय आमदार निलम गोऱ्हे, आदेश बांदेकर, यांनीही प्रचारात सहभाग घेतला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी आहे. मात्र कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा प्रचार जोरात आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर नेतृत्व करीत आहेत. जिल्हाध्यक्ष आमदार डॉ सतीश पाटील, गफ्फार मलीक, माजी विधानसभा सभापती अरूण गुजराथी प्रचारात उतरले आहेत. कॉंग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, आमदार अब्दुल सत्तार, महानगराध्यक्ष अर्जून भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ.राध्येश्‍याम चौधरी प्रचारात उतरले आहेत. परंतु प्रदेशस्तरावरून कोणतेही नेते प्रचारास आले नाही. एमआयएमचे खासदार ओवेसी यांची एक सभा घेण्यात आली. समाजवादी पक्षाचेही राज्यस्तरावरील कोणतेही नेते आलेले नाही. 

कर्ज, गाळेप्रश्‍नासह स्थानिक मुद्दे 
प्रचारात सर्वच पक्षातर्फे स्थानिक मुद्यावरच भर देण्यात आला आहे. जळगाव महापालिकेवर असलेल्या कर्जाची फेड, महापालिका व्यापारी संकुलातील गाळे नूतनीकरणाचा प्रश्‍न, व शहराचा विकास हेच प्रचाराचे मुद्दे आहेत. शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर गेल्या 30 वर्षापासून सत्ता आहे.त्यांनीही विकासासाठी आम्हालाच निवडून द्या असे अवाहन केले आहे. त्यांनी "विकासनामा'असा त्यांचा जाहिरनामाही प्रसिध्द केला आहे. गेल्या तीस वर्षात केलेल्या विकासाची माहितीही त्यांनी दिली आहे. तर आता विकास ठप्प होण्यास भाजपच कारणीभूत असल्याचा आरोप त्यानीं केला आहे. शिवाय कर्जफेड, गाळे नतूनीकरणात राज्यातील शासनानेच अडचणी उभ्या केल्या असा त्यांचा आरोप आहे. तर भाजपनेही गेल्या तीस वर्षात कोणताही विकास झालेला नाही. जनतेला त्यांना तीस वर्षे संधी दिली आम्हाला यावेळी एक संधी द्या आम्ही विकास करून दाखवितो असे अवाहन केले आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तर आम्हाला सत्ता दिल्यास आम्ही एका वर्षात जनतेला मुलभूत सुविधा मिळवून देतो.केंद्र व राज्यातील सत्तेच्या बळावर आम्ही 200 कोटी रूपये आणून विकास करणार आहोत. तसेच कर्जफेडीसाठीही प्रयत्न करणार आहोत. आणि गाळेधारकांचा प्रश्‍न सोडवून नियमानुसार त्यांचे करार करून घेणार आहोत. अशी हमी त्यांनी दिली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र दोन्हीही पक्ष भूलथापा देत असून त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका असे अवाहन जनतेला केले आहे.त्यामुळे प्रचारातील कोणाचे मुद्ये जनतेला पटणार हे निकालाच्या वेळी कळणार आहे. 

लोकसभेची चाचणी 
जळगाव महापालिकेची निवडणूक असली तरी या निवडणूकीला येत्या वर्षभरात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीनेच पाहिले जात आहे. आजपर्यंत लोकसभा भाजप-सेना युतीव्दारेच लढण्यात आली. मात्र शिवसेनेने यावेळी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास काय होईल? याचीही चाचणीही ते करीत आहेत. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसही आपल्या आघाडीला जनता कितपत स्विकारते याचीही चाचपणी करीत आहेत. महापालिका निवडणूकीचा एकदंर कल पाहिता भाजप-सेना यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रचार यंत्रणेमुळे त्यांना यावेळी सत्ता मिळण्याची अपेक्षा आहे.तर शिवसेनेलाही आमदार जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता कायम राहण्याची जिद्द आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी जेमतेमच राहण्याची शक्‍यता असली तरी "किंगमेकर'ची भूमिका असण्याची त्यांची अपेक्षा आहे. 

मराठा आंदोलनाचा दणका 
निवडणूकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा दणका जळगावातही बसला .भाजप तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र मराठा क्रांती मोर्चातर्फे "आधी आरक्षण द्या मगच जळगावात या'असा ईशारा देण्यात आला होता. पक्षातर्फे सभेची तयारीही करण्यात आली होती. मात्र अखेर ती सभा रद्दकरण्यात आली 

लढवय्या नगरसेवकाचे निधन 
जळगाव महापालिकेत गेल्या 30 वर्षांपासून नगरसेवक असलेल्या महानगर विकास आघाडीचे अध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांचे निवडणूककाळातच अकाली निधन झाल्याने जळगावकरांना त्याची हुरहुर आहे. पाटील यांनी महापालिकेच्या गैरकारभाराविरुद्ध एकाकी लढा सभागृहापासून तर न्यायालयापर्यंत दिला. 
जळगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. आता पुढे मतदारांसमोर सर्वच पक्षांची परीक्षा आहे. शिवसेनेतर्फे प्रथमच लोकसभा स्वतंत्र लढण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यात जळगाव शहरात मोठी मतदारसंख्या आहे. त्यामुळे निकालावर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे आडाखे बांधले जाणार आहेत. त्या निवडणुकीचीही चाचणीच ठरणार आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com