जैन, खडसेंच्या नेतृत्वाला टक्कर देऊन गिरीश महाजन बनले "किंग' 

live photo
live photo

जळगाव : जिल्ह्यात सुरेशदादा जैन व एकनाथ खडसे यांचे नेतृत्व होते. मात्र, या दोघांनाही टक्कर देऊन गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेवर भाजपचा निर्विवाद झेंडा फडकावून आपणच नेतृत्वाचे "किंग' आहोत, हे सिद्ध करून दाखविले आहे. खडसे यांनी जैन यांच्याशी विरोध पत्करून जे वीस वर्षांत साध्य केले नाही, ते महाजन यांनी अवघ्या एका वर्षांत जैन यांच्याशी विरोध न करता मैत्री करून साध्य केले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सद्य:स्थितीत नेतृत्वाबाबत नेहमीच चर्चा होत होती. सुरेशदादा जैन व एकनाथ खडसे यांच्यात कट्टर विरोध आहे. दोघे नेते आहेत. परंतु जैन यांना मध्यंतरी महापालिकेतील कथित गैरकारभारावरून अनेक अडचणी निर्माण झाल्या. तर एकनाथ खडसे यांच्या पक्षाची केंद्रात व राज्यात सत्ता आहे. मात्र त्यांना वैयक्तिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांना मंत्रिमंडळातून दूर व्हावे लागले. तर भाजपमध्ये जिल्ह्यात गिरीश महाजन व खडसे यांच्यात वाद असल्याने सांगलीतील चंद्रकांत पाटील यांना जळगावात पालकमंत्रीपदावर नियुक्त करण्यात आले. मात्र पाटील यांनी महापालिका निवडणुकीकडे पाठ फिरविली. जलसपंदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेच्या निवडणुकीचे नेतृत्व केले. 
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी महापालिकेच्या सभेत प्रचार केला असला तरी त्यांनी नेतृत्व मात्र केले नाही. त्यामुळे भाजपला यश मिळाले तरी खडसे मात्र त्यात नाही, असेच म्हणावे लागेल. उलटपक्षी खडसे यांचे कट्टर समर्थक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, श्रीमती तडवी, रवींद्र पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे. यात केवळ सुनील खडके हे खडसे समर्थक निवडून आले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे महाजन यांनी खडसे यांच्या नेतृत्वालाही आता मागे टाकले आहे. तर दुसरीकडे सुरेशदादा जैन यांचे नेतृत्वही आता झाकोळले गेले आहे. 


नेतृत्वावर शिक्कामोर्तब 
विशेष म्हणजे जैन आणि महाजन यांचे सख्य आहे. महाजन हे जैन यांना आपले गुरू मानतात. एवढेच नव्हे जैन अडचणीत असताना महाजन यांनी त्यांना साथ दिली. परंतु निवडणुकीत मात्र त्यांच्या विरोधात उभे राहून त्यांना पराभवाचा चांगलाच झटका दिला आहे. त्यामुळे महाजन यांनी जैन यांच्या नेतृत्वालाही धोबीपछाड देऊन आपल्या जिल्ह्यातील नेतृत्वावरही शिक्कामोर्तब केले असून, प्रतीक्षेतील जळगावच्या पालकमंत्रिपदाची वाटही मोकळी करून घेतली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com