फिटनेस फंडा : ललित कोल्हे यांचे दररोज "वॉकिंग', सूर्यनमस्कार 

फिटनेस फंडा : ललित कोल्हे यांचे दररोज "वॉकिंग', सूर्यनमस्कार 

कोल्हे परिवाराने जळगावच्या राजकीय क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. आजोबा (कै.) पंडित उखा कोल्हे जळगावचे नगराध्यक्ष होते. त्यांचा वारसा परिवाराने पुढे चालविला आहे. त्यांच्या तिसऱ्या पिढीतील महापौर ललित कोल्हे यांनी राजकीय क्षेत्रात एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली मनसेतर्फे तब्बल बारा नगरसेवक निवडून आले होते. त्याच बळावर ते जळगावचे महापौर आहेत. आताही ते भाजपतर्फे निवडणुकीच्या मैदानात आहेत. राजकीय धावपळीत ते शारीरिक तंदुरूस्तीकडे लक्ष देताना दररोज सकाळी "वॉकिंग'त्यानंतर सूर्यनमस्कार, बैठका असा त्यांचा व्यायाम आहे. आणि हलका आहार हीच त्यांच्या दिवसभराच्या तंदुरुस्तीची ऊर्जा आहे. 
 
महापौर ललित कोल्हे एल. के. फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असतात. नगरसेवक म्हणून त्यांचे प्रभागातील नागरिकांना सुविधा देण्याकडे लक्ष असतेच आता महापौर म्हणूनही त्यांचे शहरातील जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे कल असतो. सकाळपासून त्यांची धावपळ सुरू असते. मात्र यातूनही ते आपल्या शरीराच्या तंदुरूस्तीकडे लक्ष देत असतात. 

असा आहे दिनक्रम 
व्यवसाय, सामाजिक कार्य तसेच राजकीय धावपळ अशी त्यांची कामाची व्यस्तता असली तरी ते दररोज पहाटे पाचला उठतात. कोल्हे नगरातील आपल्या निवासस्थापासून ते शासकीय पॉलिटेक्‍निक कॉलेजपर्यंत तीन ते चार किलोमीटर वॉकिंग करतात. तेथून ते पुन्हा पायी निवासस्थानी येतात. घरी आल्यानंतर सूर्यनमस्कार करतात, बैठका मारतात. त्यानंतर तयारी करून सकाळी आठ वाजता पोहे, मटकीची उसळ असा हलका नाष्टा घेतात. दुपारी एक वाजता त्यांचा जेवणाचा प्रयत्न असतो, मात्र धावपळीत ते शक्‍य होत नाही. दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या या सोबत दोन भाज्या असतातच. दुपारी पुन्हा चार वाजता हलका नाष्टा, रात्री हलके जेवण व फळे. संपूर्ण शाकाहारी भोजन ते घेतात. विशेष म्हणजे बाहेरगावी असल्यास आपण घरून जेवणाचा डबा सोबत घेतो, बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळतो असे ते सांगतात. बाहेरगावी असल्यानंतरही हा दिनक्रम ते फारसा चुकवीत नाहीत. आता निवडणूक प्रचाराची धावपळ सुरू असतानाही त्यांचा हा नित्यनेम सुरूच आहे. 
 
व्यवसाय आणि राजकीय जीवनात प्रत्येकाला धावपळ करावीच लागते. यात जेवणाच्या वेळा निश्‍चित नसतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिंग तंदुरुस्तीसाठी सकाळी व्यायाम आवश्‍यक आहेच. परंतु खाण्याच्या बाबतीतही सतर्क राहण्याची गरज आहे. त्यामुळे रोजच्या कामात ऊर्जा मिळतेच आणि शरीरही निरोगी राहते. 
-ललित कोल्हे महापौर, जळगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com