नेत्यांचा फिटनेस - प्राणायाम, हलक्‍या व्यायामाने शारीरिक तंदुरुस्तीवर भर : खासदार रक्षा खडसे

raksha khadse
raksha khadse

रक्षा खडसे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा. रावेर मतदारसंघाच्या खासदार. दिल्ली, मुंबई, मुक्ताईनगर, जळगाव अशा चार ठिकाणची सातत्याने होणारी धावपळ. अशातही रक्षाताईंनी आपला फिटनेस अगदी उत्तम राखला आहे. पहाटे उठून नियमितपणे योगासने, प्राणायामवर त्यांचा भर असतो. हलका व्यायाम करून, दूध घेतल्यानंतर त्या कामाला लागतात. त्यातूनच त्या त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखत आहेत. 
 
2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्‍याने निवडून आलेल्या रक्षा खडसे खासदार होण्याआधी ग्रामपंचायत सदस्या, जिल्हा परिषद सदस्या व सभापती होत्या. एकनाथ खडसेंकडून त्यांना राजकारणाचे धडे मिळाले आणि त्यांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीच्या जोरावर या संधीचं सोनं केलं, असंच म्हणावं लागेल. खडसे नाव लागले म्हणजे जबाबदारी वाढते. घरी कार्यकर्त्यांचा सारखा रतीब. लोकनेत्याच्या कुटुंबातील सदस्य म्हणून व्यक्तिशः मतदारसंघातही संपर्क राखणे गरजेचे असते. रक्षाताईंच्या बाबतीत तसेच झाले. जिल्हा परिषद सभापतीपदानंतर त्या थेट लोकसभेत रावेर मतदारसंघाच्या प्रतिनिधी म्हणून गेल्या आणि त्यांच्या कामाचा "कॅनव्हास' वाढला.. सोबतच व्याप व तणावही वाढला. अशाही स्थितीत त्यांनी आपला फिटनेस कायम राखला आहे. 
पहाटे सहा-साडेसहा वाजता उठून त्या प्रारंभी योगा, प्राणायाम करतात. थोडा वेळ असला तर हलका व्यायाम. नंतर तयार होऊन ग्लासभर दूध. मुक्ताईनगरच्या घरी असतील तर सकाळी 9 वाजेपासून घरीच कार्यकर्त्यांशी संवाद, नागरिक-मतदारांचे प्रश्‍न व समस्या समजून घेणे. कामांसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करणे व अन्य कामे आटोपली जातात. निवासस्थानी असतील तर दुपारी 1 ते 2च्या सुमारास पोळी-भाजीचे जेवण. जेवणात हिरव्या पालेभाज्यांवर भर. मतदारसंघात दौरा असेल तर जेवणाची वेळ चुकते. दौऱ्यात कुठेतरी कार्यकर्त्याच्या घरी भोजन घेण्यास त्यांची पसंती असते. प्रवासातही बाहेरचे, तेलकट पदार्थ वर्ज्य. पदार्थांमध्ये साखर, मिठाचे प्रमाण अत्यंत कमी असते. सायंकाळी थोडा नाश्‍ता, रात्री हलके जेवण, असा त्यांचा नित्यक्रम. 

संगीत ऐकायला आवडते 
जळगावी, मुंबई अथवा दिल्लीला असतील तरीही रक्षाताईंच्या या दिनचर्येत कोणताही बदल होत नाही. शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक स्वास्थ्यही महत्त्वाचे असते. त्यासाठी वेळ मिळेल तेव्हा संगीत ऐकण्याची त्यांची आवड. प्रवासात गाडीत हलक्‍या आवाजातील संगीत सुरू असते. त्यातून विरंगुळा होतो, मनही शांत राहते. मुलांमध्ये काही वेळ घालवला तरीही ऊर्जा मिळते, असे त्या आवर्जून सांगतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com