आठवर्षीय मुलीचे अपहरण करून निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

जळगाव : समतानगरातून मंगळवारी (12 जून) रात्रीपासून बेपत्ता झालेल्या आठवर्षीय मुलीचा पोत्यात बांधून ठेवलेला मृतदेह आज सकाळी कोल्हे हिल्स परिसरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. याच परिसरातील भोंदू आदेशबाबाविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे. मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होत असून, त्यादृष्टीने पोलिस तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

जळगाव : समतानगरातून मंगळवारी (12 जून) रात्रीपासून बेपत्ता झालेल्या आठवर्षीय मुलीचा पोत्यात बांधून ठेवलेला मृतदेह आज सकाळी कोल्हे हिल्स परिसरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. याच परिसरातील भोंदू आदेशबाबाविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे. मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होत असून, त्यादृष्टीने पोलिस तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. 
समतानगरातील शिवमंदिराजवळील धामणगाव वाड्यातील रहिवासी महिलेची आठवर्षीय मुलगी अलका (काल्पनिक नाव) दादीकडे जाते, असे सांगून मंगळवारी सायंकाळी घरातून गेली होती. दोन तास होऊनही मुलगी घरी परतली नाही म्हणून आईने तिच्या शोधार्थ सासूचे घर गाठत विचारणा केली. मात्र, तिथे ती पोचलीच नव्हती. नणंदेकडे शोध घेतल्यानंतर मुलगी तेथेही नव्हती. त्यामुळे भेदरलेल्या कुटुंबीयांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. 

आदेशबाबासोबत पाहिले 
गल्लीत आनंदा तात्याराव लहाने ऊर्फ आदेशबाबासोबत मुलगी गेल्याचे कळल्यानंतर कुटुंबीयांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठले. घडल्या प्रकाराची दखल घेत निरीक्षक बापू रोहोम यांनी मुलीच्या शोधार्थ पोलिस कर्मचारी पाठविले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती सापडली नाही. अखेर पावणेदोनच्या सुमारास पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत तक्रार नोंदवून आनंदा साळुंखे ऊर्फ आदेशबाबाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

निर्जन टेकडीवर मृतदेह 
समतानगराजवळील कोल्हे हिल्सकडे जाणाऱ्या रस्त्यावरील निर्जन टेकडीवर सकाळी शौचास जाणाऱ्या महिलांना पोत्याजवळ काही कुत्रे घुटमळत असल्याचे दिसले. थोड्याच वेळात चारण्यासाठी बकऱ्या हाकलत असलेल्या महिलेने जवळ जाऊन बघितले असता, त्यातून पाय बाहेर आलेला दिसला. तिने पळत जाऊन समोरील महिलांसह समतानगरात या प्रकाराबाबत सांगितले. रहिवाशांसह तरुणांनी टेकडीच्या दिशेने धाव घेत पोलिसांना घटना कळविली. निरीक्षक बापू रोहोम, डीबी पथक, श्‍वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी, पंचनामा करून मृतदेहाचे अवलोकन केल्यानंतर तो अर्धनग्न अवस्थेत पोत्यात भरलेल्या अवस्थेत होता. हा बेपत्ता मुलीचा असल्याचे कुटुंबीयांनी ओळखले आणि घटनास्थळीच प्रचंड आक्रोश केला. 
 
वैद्यकीय समितीसमोर शवविच्छेदन 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. नितीन देवराज, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. नीता भोळे या तीन सदस्यांच्या समितीने शवविच्छेदन केले. तिच्या डाव्या पायाला जखमा असून, अंगावर ओरबाडल्याच्या खुणा आढळल्या आहेत. मुलीवर अत्याचार झाला आहे किंवा कसे, याबाबत डॉक्‍टरांनी अहवाल अद्याप राखीव ठेवला आहे. 

हत्येमागच्या कारणांचा शोध 
आज सकाळी महिलेस हा मृतदेह दिसल्यानंतर मुलीच्या अपहरण व हत्येचा प्रकार उघडकीस आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. समतानगर दाट वस्तीचा परिसर असताना या मुलीचे अपहरण होते, निर्जनस्थळी नेत तिची हत्या होते, तोवर कुणाला काहीच पत्ता लागत नाही, त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिवाय, या घटनेमागचा उद्देश काय, हा प्रश्‍न अनुत्तरित असून, गुप्तधनासाठी नरबळीचा संशय व्यक्त होत आहे. मुलीवर अत्याचार झाला किंवा कसे, यादृष्टीनेही तपास सुरू आहे. 

Web Title: marathi news jalgaon girl kidnap and murder