महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीबाबत संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

जळगाव : लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भाजप युतीप्रमाणेच जळगाव महापालिका निवडणुकीचीही गत झाली आहे. युतीची घोषणा करणारे नेते मात्र निर्णय घेण्यास तयार नाहीत. दुसरीकडे शिवसेना 50 आणि भाजपला 25 जागा असा "फॉर्म्युला' तयार झाल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेनंतर तयारीला लागलेल्या इच्छुकांमध्येच आता संभ्रम निर्माण झाला आहे. 

जळगाव : लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भाजप युतीप्रमाणेच जळगाव महापालिका निवडणुकीचीही गत झाली आहे. युतीची घोषणा करणारे नेते मात्र निर्णय घेण्यास तयार नाहीत. दुसरीकडे शिवसेना 50 आणि भाजपला 25 जागा असा "फॉर्म्युला' तयार झाल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेनंतर तयारीला लागलेल्या इच्छुकांमध्येच आता संभ्रम निर्माण झाला आहे. 
जळगाव महापालिकेच्या प्रभाग रचनेनंतर इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.एका प्रभाग चार उमेदवार असल्यामुळे प्रत्येक उमेदवार आपल्या सहकाऱ्याची तयारी करीत आहे. प्रभागाची रचना पाहता तसेच इतर तीन सहकाऱ्यांना सोबत घेऊन विजयाची रणनीती आखावी लागत असल्यामुळे पक्ष किंवा आघाडीतर्फेच उमेदवारी सोईस्कर असणार आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या पक्षांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. 

युतीवर नेते ठाम 
भाजप-शिवसेना युती करण्याचे संकेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत. शिवसेनानेते सुरेशदादा जैन व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात युती होईल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे युती करण्यास दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध आहे. मुंबईतून जळगाव जिल्ह्यात नियुक्त झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांचाही विरोध आहे. त्यांनीही स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा आग्रह धरला आहे. अशा स्थितीत जैन व महाजन मात्र युती करण्यावर ठाम आहेत. 

भाजप 25 जागा घेणार काय? 
युतीबाबत निर्णय झालेला नसला तरी त्यांच्यातील जागावाटपाचा "फॉर्म्युला' तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 50 जागा घेणार असून भाजपला 25 जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे भाजप केवळ 25 जागांवर भाजप तयार होणार काय? यावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपने फारच आग्रह धरल्यास शिवसेना त्यांना आणखी पाच जागा देईल. त्यामुळे 45-30चा फॉर्म्युला होण्याची शक्‍यता आहे. त्या पलीकडे शिवसेना अधिक जागा सोडण्यास तयार होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

नेत्यांच्या बैठकीकडे लक्ष 
गिरीश महाजन व सुरेशदादा जैन यांची युतीबाबत बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दोन्हीकडील इच्छुक उमेदवारांचे त्याकडेच लक्ष आहे. दुसरीकडे दोन्ही पक्षातील नेत्यांनी महापौर आपल्या पक्षाचाच होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यात जागा वाटपात शिवसेना जास्त जागा घेणार आहे. त्यामुळे भाजपला महापौरपदाची संधी मिळणार कशी, असा प्रश्‍नही आहे. त्यामुळे युतीबाबत इच्छुक उमेदवारांत संभ्रम निर्माण झाला आहे. अर्थात, जागावाटपाच्या फॉर्म्युलाची चर्चा असली तरी लवकरच त्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेतील युतीबाबत आज चर्चा करणार होतो. मात्र आपल्याला पक्षाच्या केंद्रीय नेत्याकडून फोन आल्याने आपण तातडीने विमानाने अहमदाबादला जात आहोत. मात्र, तेथून आल्यावर यासंदर्भात चर्चा करू. 
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री, महाराष्ट्र 

Web Title: marathi news jalgaon mahapalika bjp shivsena