विवस्त्र धिंड प्रकरणी 21 जणांना कारावास

residentional photo
residentional photo

जळगाव : नांदेड (ता. धरणगाव) येथील बत्तीस वर्षीय विवाहितेचे शेत बटाईसाठी पैशांची बोलणी करण्यास आलेल्या डॉक्‍टरसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत गावकीने या दोघांची नग्न धिंड काढली होती. या प्रकरणी दाखल खटल्यात 27 पैकी 21 संशयितांना न्यायालयाने दोषी ठरवून एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. उर्वरित 4 संशयित मृत झाले असून, दोघे अल्पवयीन आहेत. याशिवाय मंगल हरी सुतार आणि एकनाथ सोनू मोरे या दोघांना पुराव्याअभावी मुक्त करण्यात आले. देशभर गाजलेल्या या प्रकरणात न्यायालयाने गावकीच्या दंडेलीला चपराकच लगावली आहे. 

धरणगाव तालुक्‍यातील नांदेड गावातील रहिवासी अभिमन कोळी (काल्पनिक नाव) यांच्याकडील 25 एकर शेतीपैकी बहुतांश शेतजमीन डॉ. अनिल वसंत चौधरी यांना बटाईने देण्यात आली होती. या संदर्भातील पैशांची बोलणी करण्यासाठी डॉ. चौधरी हे 19 जुलै 2010ला संध्याकाळी कोळी यांच्या घरी आले होते. तेव्हा घरात त्यांच्या पत्नी बबिता (काल्पनिक नाव) व बरा वर्षीय मुलगी असे दोघेच होते. 

संशयातून काढली धिंड 
याचदरम्यान गावातील एका टोळक्‍याने कोळी यांच्या घरात प्रवेश करीत दोघांना घराबाहेर ओढून काढले. दोघांच्या अंगावरील कपडे फाडून विवस्त्र धिंड काढत गावातील मुख्य चौकात खांबाला बांधून मारहाणही केली होती. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून 23 जुलैस धरणगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद होऊन 27 संशयित गावकऱ्यांना अटक करण्यात आली. 

8 वर्षे 18 साक्षीदार 
दाखल खटल्याचे कामकाज न्या. नीलिमा पाटील यांच्या न्यायालयात सुरू होते. सरकार पक्षाने 18 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. पीडितेसह तिचा पती, बारा वर्षीय मुलगी, तपासाधिकारी, समाजसेविका अरुणा कंखरे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी अभियोक्ता ऍड. आशा शर्मा यांनी सुमारे दहा ते बारा दिवस युक्तिवाद करून गुन्ह्याचे गांभीर्य आणि समाजाची विकृत मानसिकता आदी मुद्दे न्यायालयासमोर मांडले. बचावपक्षातर्फे ऍड. गणेश सोनवणे यांनी 3 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. 

शिक्षा झालेले आरोपी संशयित आरोपी असे 
गजानन सोमनाथ कोळी, गोकूळ सुरेश कोळी, विकास अशोक कोळी, भरत प्रकाश कोळी, उखर्डू देवचंद कोळी, महेश मधुकर कोळी, मंगल हरी सुतार, विनोद नामदेव कोळी, रवींद्र नथ्थू कोळी, रामचंद्र भगवान कोळी, जीवन नेताजी कोळी, पोलिस पाटील एकनाथ सोनू मोरे, सतरावर्षीय अल्पवयीन, एकनाथ ऊर्फ छोटू रघुनाथ कोळी, दगडू अभिमन कोळी, युवराज राजाराम कोळी, भटू रमेश कोळी, संजय शालिक कोळी, ईश्‍वर नारायण कोळी, सुभाष भिका कोळी, भरत पुंडलिक कोळी, विजय नारायण पाटील-कोळी, ज्ञानदेव नागो कोळी, बापू संतोष कोळी (मृत), समाधान नथ्थू कोळी (मृत), नथ्थू पुंडलिक कोळी (मृत). 

दंडाऐवजी नुकसान भरपाई 
न्या. नीलिमा पाटील यांच्या न्यायालयाने संशयितांनी फिर्यादी पीडित व साक्षीदार डॉ. अनिल चौधरी या दोघांना प्रत्येकी 2 हजार व 19 हजारांची नुकसान भरपाई द्यावी, असे निकालात नमूद केले आहे. या शिक्षेतून संशयितांनी न्यायालयीन कोठडीत भोगलेली शिक्षा वगळण्यात येणार आहे. 

कठोर शिक्षेची मागणी करणार 
महिला कायद्याच्या देखरेखीत सुरक्षित आहे, अशी हमी या निकालातून मिळेल. अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीच्या या प्रकरणात शिक्षा मिळवणे, अर्थात दोषारोप सिद्ध करणे महत्त्वाचे होते. तरीही, मिळालेल्या शिक्षेविरुद्ध अपिलात जाऊन कठोर शिक्षेची मागणी करणार आहे. 
- ऍड. आशा शर्मा, सहाय्यक सरकारी अभियोक्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com