रस्त्याचे काम आधी, नंतरच मतदान! 

रस्त्याचे काम आधी, नंतरच मतदान! 

जळगाव : नागरी सुविधांच्या बाबतीत अनेक वर्षांपासून नरकयातना भोगणाऱ्या काही भागातील नागरिकांचा आता उद्रेक होऊ लागला आहे. शहरातील शंकररावनगर भागात प्रचाराला जाणाऱ्या उमेदवारांना त्याचा अनुभव आला. येथील नागरिकांनी "रस्त्याचे काम आधी करा.. काम आताच शक्‍य नाही, त्यामुळे या कामाचे पैसे अनामत म्हणून ठेवत असेल त्याच उमेदवाराला मतदान करू' असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे उमेदवारांची पंचाईत झाली असून, त्यांना फिरणेही कठीण झाले आहे. 
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आता विविध प्रभागांमधून उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली आहे. या प्रचाराच्या निमित्ताने त्यांना कुठे आशीर्वाद, कुठे प्रोत्साहन मिळतेय, तर कुठे नाराजीचा सूर नागरिकांमधून उमटलेला दिसतो. एका प्रभागात मात्र, तेथील रहिवाशांनी उमेदवारांना थेट आव्हानच देऊन टाकले आहे. 

रस्त्याची बिकट वाट 
महामार्गालगत कालिंकामाता मंदिर चौकातून उजवीकडे जाणारा रस्ता थेट शंकररावनगरात जातो. जास्त नाही पण, पाच-सातशे नागरिकांची ही वस्ती. चांगली घरे, बंगले विकसित झालेले. एक-दोन महाविद्यालयेही याठिकाणी सुरू झालेली. मात्र, या नगरात यायला रस्ताच नाही. जमीन काळी मातीची, त्यामुळे थोडाही पाऊस पडला तरी प्रचंड चिखल. अशा चिखलातून पायी चालणे कठीण, तर वाहन कुठून नेणार, अशी स्थिती. पाच-सात वर्षे झाली हा परिसर विकसित होऊन. मात्र, याठिकाणचे रस्ते काही झाले नाही. अगदी मुरमाचे, कच्चे रस्ते तरी तयार करा, असे येथील नागरिक ओरडून सांगत आले, पण उपयोग झाला नाही. 

.. आणि रहिवाशांचा उद्रेक 
रस्त्यासह अन्य सुविधांचीही ऐशीतैशी. तशातच आता निवडणुका लागल्या. एरवी कुणी नगरसेवक इकडे फिरकायला तयार नाही, मात्र निवडणूक असल्याने वावर वाढला व उमेदवार प्रचारासाठी जाऊ लागले. आता मात्र रहिवाशांचा उद्रेक झाला. अनेक दिवस झाले मागणी करून, पण रस्ता झाला नाही. आतातर निवडणूक लागली, आचारसंहितेमुळे तो होऊ शकत नाही. मात्र, जो उमेदवार या रस्त्याच्या कामाची रक्कम अनामत म्हणून रहिवाशांकडे जमा करेल, त्यालाच आम्ही मतदान करू, असा आक्रमक पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे. त्यांचा हा उद्रेक पाहून उमेदवारही अचंबित झालेत. त्यांचे प्रचारासाठी फिरणे कठीण होऊन बसले असून नागरिक मात्र आपली भूमिका मागे घ्यायला तयार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com