पीएच.डी. "कॉपी'प्रकरणी सत्यशोधन समिती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भौतिकशास्त्र विद्याशाखेतील तिघांच्या पीएच.डी. संशोधनाचे प्रबंध "कॉपी पेस्ट' असल्याचे वृत्त आज "सकाळ'ने ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षणवर्तुळात खळबळ उडाली. विद्यापीठात "डॅमेज कंट्रोल' म्हणून दिवसभर बैठका चालल्या.त्यातून या प्रकरणाच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती नेमण्याचा निर्णय झाला. कुलगुरुंनीच यासंदर्भात माहिती दिली असून ही समिती चौकशी करुन अहवाल सादर करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 2014 व 2015 या दोन वर्षांत भौतिकशास्त्र विद्याशाखेतून सादर झालेल्या व पीएच.डी. मिळालेल्या तीन उमेदवारांचे संशोधन संशयाच्या भोवऱ्यात आहे. प्रशांत जगताप, मोहम्मद इब्राहिम अबुअसाज व प्रमोद पाटील अशी तिघा अभ्यासकांची नावे असून या तिघांचे प्रबंध "कॉपी पेस्ट' असल्याचे प्रकरण समोर आले आहे. 

विद्यापीठाच्या बैठकांमध्ये खल 
याआधीही विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पीएच.डी. संशोधनात वाड्‌.मयचौर्याचे प्रकार समोर आले होते, त्यांची त्या-त्या वेळी चौकशीही झाली. आणि आता नव्याने भौतिकशास्त्र शाखेतील तीन प्रबंध कॉपी असल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासन चांगलेच हादरले. कुलगुरु प्रा.डॉ. पी.पी. पाटील यांनी त्याची तातडीने दखल घेत विद्यापीठात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत चर्चा केली. बराचवेळ चाललेल्या या बैठकीत पीएच.डी. प्रकरणावरच मोठी चर्चा झाल्याचे समजते. 

सत्यशोधन समिती नियुक्त 
बैठकीत या प्रकरणाशी संबंधित विषयावर चर्चा झाल्यानंतर कुलगुरु डॉ. पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीत विद्यापीठ प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह विद्यापीठाच्या बाहेरील तीन तज्ज्ञांचा समावेश असेल. ही चार-पाच सदस्यीय समिती प्रकरणाची योग्यप्रकारे चौकशी करुन त्यातील तथ्ये समोर आणेल. समितीच्या चौकशी अहवालातील शिफारसीनुसार या प्रकरणात कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. 
 
अन्य विभागांमध्येही शक्‍यता 
पीएच.डी. संशोधनातील "कॉपी' प्रकरण उजेडात आल्यानंतर अन्य विभागांमध्येही असे प्रकार असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. विद्यापीठ प्रशासनात कार्यरत आणखी काही प्राध्यापकांच्या प्रबंधांवरही संशय व्यक्त केला जात असून त्याचीही विद्यापीठ प्रशासन दखल घेऊन चौकशी करेल काय, याकडे लक्ष लागून आहे. 

पीएच.डी. संशोधन प्रबंधातील "कॉपी' प्रकरण अत्यंत गंभीर व दुर्दैवी आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करुन कुणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. विद्यापीठ प्रशासन शैक्षणिक गुणवत्तेशी कदापि तडजोड करणार नाही. 
 प्रा.डॉ. पी.पी. पाटील, कुलगुरु, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. 
 
Web Title: marathi news jalgaon univercity sakal impact