प्रेयसीच्या आत्महत्येचे कारण गुलदस्तात; प्रियकर फरार! 

एल. बी. चौधरी
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

सोनगीर (जि. धुळे) : विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुण प्रेयसीस सोडून फरार झालेल्या प्रियकराचा पोलिस चौफेर शोध घेत आहेत. त्या प्रियकराने सरवड येथील एकाचा मोबाईल फोन नेला होता आणि तो सध्या बंद असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचण येत आहे. दरम्यान, स्वत:हून प्रियकरासह पळून आलेल्या प्रेयसीने आत्महत्या का केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. 

सोनगीर (जि. धुळे) : विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुण प्रेयसीस सोडून फरार झालेल्या प्रियकराचा पोलिस चौफेर शोध घेत आहेत. त्या प्रियकराने सरवड येथील एकाचा मोबाईल फोन नेला होता आणि तो सध्या बंद असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचण येत आहे. दरम्यान, स्वत:हून प्रियकरासह पळून आलेल्या प्रेयसीने आत्महत्या का केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. 

गुजरातमधील जुनागड येथील एक प्रेमी युगूल घरातून पळून धुळे येथील सरवडमध्ये आले. येथे एका आदिवासी महिलेच्या मध्यस्थीने त्यांनी शेतमजुरी करण्यास सुरवात केली. 'लग्नाला घरच्यांचा विरोध असल्याने पळून आलो', असे त्यांनी या महिलेला सांगितले होते. त्यांनी या महिलेच्या शेजारीच भाड्याने घर घेतले. त्यानंतर आठ-दहा दिवस त्यांनी शेतात कामही केले. 

याच दरम्यान 24 जुलै रोजी सकाळी त्या तरुणीने सरवडमधील अरुण बोरसे यांच्या शेतात विषारी औषध प्राशन केले. तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती बिघडल्याने तिला धुळ्यात शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिचे निधन झाले. यानंतर तो तरुण फरार झाला. त्याने धुळ्याला जाताना शेजाऱ्याकडून एक मोबाईल फोन घेतला होता. तसेच, त्याच्याकडे एक दुचाकीही होती. ही दुचाकी शहादा येथून चोरीस गेल्याचे नंतर निष्पन्न झाले. 

यामुळे या प्रकरणाची आणि त्या तरुणाबाबतची गुंतागुंत वाढत चालली आहे. तो तरुण फरार झाल्याने त्या मुलीची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे 27 जुलै रोजी पोलिसांनी देवपूर येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार केले. चार दिवस तपास केल्यानंतर पोलिसांना शहादा तालुक्‍यातील म्हसवड येथे तिचा भाऊ सापडला. ती तरुणी तिच्या आई आणि भावासह गुजरातमधील जुनागड येथे राहते, अशी माहिती समोर आली. तिथेच राहणाऱ्या त्या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळले आणि नंतर ते पळून आले, असेही समजले. तो तरुण मोटारसायकल आणि मोबाईल घेऊन फरार झाला असल्याने पोलिस त्याचा सर्वत्र शोध घेत आहेत. 

दरम्यान, त्या तरुणीची आई आणि तिची धाकटी बहीण जुनागडहून येथे दाखल झाले आहेत. पोलिसांनी त्यांचीही चौकशी केली. हे दोघे दीड महिन्यापूर्वीच घरातून पळून गेले असूनही तिच्या आईने किंवा भावाने कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नसल्याचेही समोर आले आहे. 

या प्रकरणाच्या तपासासाठी धडगाव व गुजरातमधील अन्य भागांत पोलिस पथक पाठविण्यात आले आहे, असे अधिकारी उपनिरीक्षक आर. डी. पाटील यांनी सांगितले.