एकाच कुटुंबातील 25 जणांना हळद उत्पादकांसाठीचे अनुदान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

चिमूर : तालुक्‍यातील हळद उत्पादकांना नावीन्यपूर्ण सुधारित हळद लागवड कार्यक्रमांतर्गत प्रोत्साहन म्हणून मिळणारे अनुदान काजळसर येथील एकाच कुटुंबातील 25 लाभार्थींना मिळाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी उपसभापती शांताराम सेलवटकर यांच्या नेतृत्वाखाली बीडीओ डोंगरे यांना घेराव घातला. 

या कार्यक्रमांतर्गत 2014-15 च्या सत्रात चिमूर तालुक्‍यातील एकूण 80 शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर झाले होते. 2015-16 या कालावधीसाठी 80 शेतकऱ्यांना प्रतिव्यक्ती 21 हजार 700 रुपये मंजूर झाले होते. हे अनुदान मिळालेले 25 जण एकाच कुटुंबातील आहेत. तसेच, दोन लाभार्थींचे निधन झाले असल्याचेही समोर आले आहे. यामुळे या मंजूर झालेल्या यादीविषयी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. 'भाजपच्या एका नेत्याच्या सूचनेनुसार ही यादी मंजूर करण्यात आली आहे' असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. ज्यांचे नाव सातबारा उताऱ्यावरही नाही, त्यांनाही अनुदान मंजूर झाल्याचा दावा या आंदोलकांनी केला. 

संतप्त शेतकऱ्यांनी बीडीओ डोंगरे यांना घेराव घातला आणि प्रश्‍नांचा भडीमार केला. यावेळी डोंगरे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. यावर हळद उत्पादकांचे समाधान झाले नसून 'खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा', 'खोट्या लाभार्थ्यांचे अनुदान स्थगित करावे' आणि 'संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे' अशा मागण्या त्यांनी केल्या. ही कारवाई न झाल्यास पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

बीडीओ डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता 'हळद उत्पादक मंजूर लाभार्थ्यांच्या अनुदानास स्थगिती देण्याचे पत्र संबंधित बॅंकेला दिले आहे' अशी माहिती त्यांनी दिली.