सप्तश्रृंगी गडावर बोकडबळी आणि गोळीबाराची प्रथा बंद करण्याचा निर्णय

दिगंबर पाटोळ
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

वणी : साडेतीन शक्तीपीठा पैकी अर्धे व स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी गडावर नवरात्रोत्सवात दसऱ्याच्या दिवशी बोकड बळी देवून मानवंदना देण्यासाठी हवेत गोळीबार करण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा या वर्षापासून बंद करण्याचा एैतिहासिक निर्णय प्रशासन व सप्तश्रृंंगी देवी न्यासाच्यावतीने घेण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयाचा सप्तश्रृंगी गड ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

वणी : साडेतीन शक्तीपीठा पैकी अर्धे व स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी गडावर नवरात्रोत्सवात दसऱ्याच्या दिवशी बोकड बळी देवून मानवंदना देण्यासाठी हवेत गोळीबार करण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा या वर्षापासून बंद करण्याचा एैतिहासिक निर्णय प्रशासन व सप्तश्रृंंगी देवी न्यासाच्यावतीने घेण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयाचा सप्तश्रृंगी गड ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

आदिशक्ती सप्तश्रृंगी गडावर (वणी) शारदीय नवरात्रौत्सवास २१ सप्टेंबर पासून प्रांरभ होत आहे. दरवर्षी नवरात्रौत्सवात गडावर सुमारे १२ ते १५ लाख भाविक आदिमाये चरणी नतमस्तक होतात. नवरात्रोत्सवाची सांगता दसऱ्या दिवशी बोकड्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढून गडावरील दिपमाळ परीसरात बोकड्यास नेवून पांरपारीक पध्दतीने पुजाअर्चा करुन महिषासूर राक्षकासाठी बळी देण्याची पूर्वापार चालत असलेली प्रथा आहे. यावेळी बोकडबळी देतांना सप्तश्रृंगी देवी न्यासाच्यावतीने मानवंदना म्हणून हवेत गोळीबारही केला जातो. दरम्यान नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विविध विभागाच्या आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनानं बोकडबळी आणी त्यावेळी हवेत केला जाणारा गोळीबार या दोन्हीही प्रथा बंद करण्याचे आदेश देवस्थान समितीला दिले आहे.

गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी बोकड बळी देतांना न्यासाच्या मंदीर सुरक्षारक्षकाच्या रायफलमधून अनावधानाने गोळी सुटून दगडावर आपटलेल्या गोळीचे छरे उडून १५ भाविक जखमी झाले होते. सुदैवाने यावेळी जीवीत हानी टळली तरी गर्दीमुळे भाविकांची चेंगराचेंगरी होऊन अनेकांना दुखापतही झाली होती.

त्यामुळे या बोकड बळीच्या प्रथेमळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस प्रशासनाने ही प्रथा बंद व्हावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाला केली होती. अखेर आढावा बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे यंदापासून ही प्रथाच मोडीत काढण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. असे असले तरी गडावर वर्षभर भाविक नवसपूर्तीसाठी गडावर वैयक्तीकरीत्या बोकड बळी देवून गडाच्या पहिल्या पायरी परीसरात नैवद्य दाखवीत असतात. यास प्रशासनाने विरोध केला नसला तरी गडावर बोकड बळी होवूच नये यासाठी प्रशासन व सप्तश्रृंगी देवी न्यासाच्यावतीने भाविकांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे.

दरम्यान या निर्णयाबाबत भाविकांमध्ये समिश्र भावना प्रगट होत असून काहींनी निर्णयाचे स्वागत तर भाविकांसह सप्तश्रृंगी गड ग्रामस्थांनी विरोध केला आहॆ. बोकड बळी ही देवीसाठी नाही तर देवी ने वद केलेल्या महिषासुरासाठी केला जात असून पिढयान पीढ्या बोकडबळी देण्याची प्रथा असल्याचे ग्रामस्थ व काही भाविकांचे म्हणने आहे. बोकड बळी दिला नाही तर गडावर दरड कोसळण्या सारख्या नैसर्गिक आपत्ती येवून दुर्घटना होतात असा ग्रामस्थांचा समज आहे.