नाकाबंदीत सापडल्या दोन कोटींच्या नव्या नोटा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

मनमाड : येथील मालेगाव चौफुली भागात काल (ता. 23) रात्री पोलिसांनी इनोव्हा गाडीतून तब्बल एक कोटी 98 लाख 23 हजार 800 रुपयांच्या नवीन नोटा असलेली बॅग जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. नोटांसह इनोव्हा कार जप्त केली. ही रक्कम नेमकी कोणाची व कशासाठी नेली जात होती, याचा पोलिस शोध घेत आहेत. 

मनमाड : येथील मालेगाव चौफुली भागात काल (ता. 23) रात्री पोलिसांनी इनोव्हा गाडीतून तब्बल एक कोटी 98 लाख 23 हजार 800 रुपयांच्या नवीन नोटा असलेली बॅग जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. नोटांसह इनोव्हा कार जप्त केली. ही रक्कम नेमकी कोणाची व कशासाठी नेली जात होती, याचा पोलिस शोध घेत आहेत. 

मनमाडमधून जाणाऱ्या इंदूर- पुणे राज्य महामार्गाला औरंगाबाद- नाशिक मार्ग ज्या ठिकाणी मिळतो तेथील चौकाला मालेगाव चौफुली असे नाव आहे. या ठिकाणी नेहमीसारखी रात्री नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे, उपनिरीक्षक शेख व अन्य कर्मचाऱ्यांचे पथक या ठिकाणी तपासणी करत होते.

मध्यरात्री दीडच्या सुमारास मालेगावच्या दिशेने इनोव्हा कार (एमएच 12-डीवाय 5736) भरधाव येत असल्याचे पाहून तिला थांबविण्यात आले. या कारमध्ये मोहन आसाराम शेलार व महादेव विक्रम मार्कंड (दोघे रा. पुणे) हे दोघेच होते. गाडीची तपासणी केली असता, त्यांच्याजवळ बॅग आढळली. बॅग उघडून पाहिली असता, त्यात नव्या कोऱ्या नोटांचे बंडल आढळले. त्याबाबत विचापूस केली असता, दोघांनी संदिग्ध उत्तरे दिल्याने संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी रोकड व कारसह दोघांना पोलिस ठाण्यात आणले. तेथे पोलिस निरीक्षक सपकाळे यांनी पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोतदार व उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांना ही माहिती दिली.

तहसीलदारांनाही कळविण्यात आले. त्यांनी मंडल अधिकारी कैलास चौधरी, तलाठी व इतरांना पंच म्हणून पाठविले. त्यानंतर मनमाड अर्बन बॅंकेतून पैसे मोजण्याचे यंत्र मागविण्यात आले. चित्रफितीच्या देखरेखीत बॅगेतील शंभर, पाचशे व दोन हजारांच्या नवीन नोटा मोजण्यात आल्या. ही रक्कम एक कोटी 98 लाख 23 हजार 800 रुपये होती. पुण्याच्या एका बिल्डरची ही रक्कम असून, ती इंदूरहून पुण्याला नेली जात असल्याचे दोघांनी सांगितले. मात्र, एवढी मोठी रक्कम रात्री का आणि कशासाठी नेली जात होती, याचा पोलिस तपास करीत आहेत. प्राप्तिकर विभागाचे अधिकारीदेखील शहरात दाखल झाले आहेत.