अंतराळ विश्‍वातील गरुडभरारीचं तरूणाईनं करावं सोनं: डॉ. सुरेश नाईक यांचे आवाहन 

live photo
live photo

नाशिक ः उपग्रह अवकाशात सोडण्याची बाजारपेठ 320 अब्ज डॉलर्सपर्यंत पोचलीय. भारताने अग्नीबाण छोट्या-मध्यम वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्याची क्षमता सिद्ध केल्याने प्रगत राष्ट्रांची श्रीहरीकोटाकडे रांग लागलीय. आता अधिक वजनाचे शक्तीमान अग्नीबाण देशात बनवले जाताहेत. ही सारी परिस्थिती पाहता, आंतराळ विश्‍वातील मोठी संधी तरुणाईपुढे उपलब्ध झाली असून आंतराळवीर होण्याचे स्वप्न साकारता येणार आहे, असे प्रतिपादन "इस्त्रो'चे माजी अध्यक्ष आणि इंटरनॅशनल स्पेस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक यांनी आज येथे केले. 
  "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीच्या 29 व्या वर्धापनदिनानिमित्त गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या सोहळ्यात डॉ. नाईक यांनी "फ्यूचर इन स्पेस सायन्स' या विषयावर संवाद साधला. "नाशिक इनोव्हेशन फेस्ट'मधील तीन गटातील विजेत्यांचा गौरव डॉ. नाईक, महापौर रंजना भानसी, "सकाळ'चे संचालक जयदीप माने यांच्या हस्ते करण्यात आला. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, शास्त्रज्ञ, उद्योजक, बॅंकर्स, व्यावसायिक, शिक्षण संस्थांचे प्रमुख, प्राचार्य अन्‌ विद्यार्थी उपस्थित होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर हरित, धवल, नील क्रांती झाली असून आता जैवतंत्रज्ञानातील क्रांतीच्या दिशेने देश पुढे झपाट्याने निघाला आहे, असे सांगून डॉ. नाईक यांनी "इस्त्रो'च्या प्रारंभापासून ते चंद्रयान, मंगळयानापर्यंतची माहिती ध्वनीफितीच्या माध्यमातून रंजक पद्धतीने उपस्थितांपुढे ठेवली. 
     ओळखलतं या तरुणाला? अन्‌ टाळ्यांचा कडकडाट 
"इस्त्रो'ची 55 वर्षापूर्वी इस्त्रोची सुरवात नम्रपणे झाली हे सांगत असताना डॉ. नाईक यांनी रॉकेटचे सुटे भाग नारळाच्या झाडाखाली जोडत सायकलीवरुन उड्डाणतळापर्यंत नेले जायचे याची माहिती चित्रफितीद्वारे दिली. याचवेळी त्यांनी रॉकेटचे भाग जोडणाऱ्या या तरुणाला ओळखलतं का? अशी विचारणा केली. उत्सुकता न ताणता त्यांनी हे आहेत आपले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम असे सांगताच, उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. एव्हरेस्ट शिखर 9 किलोमीटर उंचीचे, 15 किलोमीटर उंचीपर्यंत विमानांचे उड्डाण होते आणि 100 किलोमीटर उंचीवर वातावरण आणि अवकाश यांच्यातील काल्पनिक सीमारेषा, तिथंपर्यंत उपग्रहाचे हवेशी होणारे घर्षण नगण्य असल्याने उपग्रह पृथ्वीभोवती फिरु शकते अशी माहिती सांगून डॉ. नाईक म्हणाले, की उपग्रह नेण्यासाठी अग्नीबाणाचा वापर केला जातो. स्वतःसमवेत इंधन आणि ऑक्‍सीजनचा साठा सोबत नेते.  अग्नीबाणाचे कार्य न्यूटनच्या क्रिया-प्रतिक्रिया या तिसऱ्या नियमानुसार चालते. अग्नीबाणामध्ये इंधनाचे प्रज्वलन होण्यासाठी ऑक्‍सीजनच्या रसायनचा वापर केला जातो. अग्नीबाणाचे उड्डाण झाल्यावर चार ते पाच मिनिटात दाट हवेच्या थरातून प्रवास होताना एक हजार अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढते. 
 

भारतीय रॉकेट 98 टक्के भरवश्‍याचे 
उपग्रहांच्या उड्डाणासाठी पूर्वी आपणाला प्रगत राष्ट्रांकडे जावे लागायचे. आता अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जर्मन ही प्रगत राष्ट्रे भारताकडे रॉकेट वापरण्यासाठी येतात. 98 टक्के भरवसा हे त्यामागील मुख्य कारण आहे. इतर प्रगत राष्ट्रांचा हाच भरवसा 90 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. आपल्या रॉकेटने 39 उड्डाणे यशस्वी केली आहेत, असे सांगून उपग्रहाला अवकाशात प्रक्षेपित करण्याच्या पुढच्या टप्प्याची माहिती दिली. ते म्हणाले, की सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव उपग्रहावर पडतो. त्यातून तो कक्षेतून भरकटतो. मग उपग्रहाच्या वेगवेगळ्या बाजूला असलेले रॉकेट भूकेंद्राकडून फायरिंग करुन प्रज्वलित केल्यावर विरुद्ध दिशेने उपग्रह गतीमान होतो. खरे म्हणजे, 1957 मध्ये पहिला उपग्रह रशियाने सोडला. त्यानंतर अमेरिका , चीन, जपान, भारत अशा राष्ट्रांनी अनेक उपग्रह सोडलेत. 

भविष्यातील चंद्रयानाच्या मोहिमा 
अवकाशातील भारताच्या कामगिरीचा अभिमान वाटावा असे यश आहे की नाही? असे डॉ. नाईक यांनी विचारताच, टाळ्यांचा कडकडाट झाला. या प्रतिसादानंतर त्यांनी भारताच्या भविष्यातील चंद्रयान मोहिमांची माहिती दिली. पुढच्याच महिन्यात चंद्रयान-2 यान अवकाशात झेप घेईल, असे सांगून ते म्हणाले, की या मोहिमेतंर्गत उपग्रह चंद्रावर उतरल्यावर 6 चाकांची बग्गी (रोवर) बाहेर येईल. त्यावरील यांत्रिक हाताद्वारे माती, दगड जमा करुन त्याची पावडर केली जाईल. येत्या सात ते आठ वर्षांमध्ये चंद्रयान मोहिम-3 होईल. त्याद्वारे दोन आंतराळवीरांना चंद्रावर उतरवून परत पृथ्वीवर आणले जाईल. त्याचप्रमाणे अग्नीबाण पुन्हा परत येईल आणि त्याचा पुन्हा वापर केला जाईल. त्यातून उड्डाणवरील खर्च एक दशांस होईल. 

अवकाशात कचऱ्याची समस्या 
इंधन संपत असल्याने उपग्रहाचे आयुष्य पंधरा वर्षांचे असते. ते मृत असले तरीही अवकाशात कचऱ्यासारखे फिरतात. त्यामुळे नवीन उपग्रहाला पार्किंगला जागा मिळत नाही. त्यासाठी जागा नोंदवावी लागते. अवकाशातील कचऱ्याच्या तुकड्याची नवीन उपग्रहाशी टक्कर होऊन नादुरुस्त होण्याची भीती असते. मग टक्कर कशी टाळली जाते याची माहिती चित्रफितीद्वारे डॉ. नाईक यांनी दिली. तसेच श्रीहरीकोटामधील उड्डाणतळावरुन रॉकेटच्या होणाऱ्या प्रात्यक्षिकाची माहितीही त्यांनी दिली. उपग्रहावरील संवेदकाला सूचना मिळताच उपग्रहाची दिशा बदलून टक्कर टाळता येते, असे सांगून ते म्हणाले, की 36 हजार किलोमीटरच्या वर उपग्रह सोडण्यातून तो पृथ्वीभोवती प्रदिक्षणा करण्यास 24 तास घेतो. 22 ऑक्‍टोंबर 2008 रोजी चंद्रयान-1 उपग्रहाचे कार्य हाती घेण्यात आले होते. फायरिंगद्वारे कक्षा वाढवली. चंद्राजवळ यान जाताना वेग कमी केला जातो. मग वर्तुळाकृती कक्षेत तो स्थिरावतो. चंद्राच्या पृष्ठभागावर आपटून कुपी (प्रोब) उतरवण्यात आली. त्याची संकल्पना डॉ. अब्दुल कलाम यांची होती. या मोहिमेद्वारे अमेरिका, रशिया, युरोपियन युनियनच्या पाठोपाठ चौथा तिरंगा चंद्रावर उतरवण्यात आला. चंद्रावर पाणी असावे असे शास्त्रज्ञांना वाटत होते. अमेरिका, रशिया, युरोप, जपान, चीनद्वारे प्रयत्न केला गेला, तरीही पाण्याचा पहिला शोध घेण्यात चंद्रयान-1 मोहिमेद्वारे भारताने बाजी मारली. 

पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहिम फत्ते 
मंगळयानाच्या 51 मोहिमांपैकी 21 म्हणजेच 40 टक्के मोहिमा यशस्वी झाल्यात. अमेरिकेच्या 30 पैकी 22, रशियाच्या 18 पैकी 2 मोहिमा यशस्वी झाल्या असून युरोप, चीन, जपानच्या प्रत्येकी एक मोहिमेला यश मिळाले नाही. या पार्श्‍वभूमीवर झालेल्या भारताच्या 5 नोव्हेंबर 2013 च्या मंगळ मोहिमेला पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या यशाला जागतिकस्तरावर मोठे महत्व प्राप्त झाले. यानाचा वेग कमी करत मंगळाच्या कक्षेत यान स्थिरावण्याच्या टप्प्यात 30 मोहिमा अयशस्वी झाल्यात. यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावत असताना 15 मिनिटांचा कम्युनिकेशन ब्लॅकआऊट असतो. मंगळावर यान पोचवल्यावर त्याचा संदेश पृथ्वीवर येण्यासाठी 12 मिनिटे लागतात. या काळात चीनला उत्कंठा लागली होती.  आंतराळवीर झोपतात कसे? शौचालयाचा वापर कसा होतो?, शॉवर घेतल्यावर व्हॅक्‍युम डिव्हाईस द्वारे खरडून कसे काढले जाते?, हाडे-स्नानू ठिसूळ होत असल्याने आंतराळवीरांना दररोज दोन तास कसा करावा लागतो व्यायाम? आहार कसा असतो? अशा सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे चित्रफितीद्वारे मिळाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com