सटाण्यात प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेतर्फे आंदोलन

रोशन खैरनार
सोमवार, 22 जानेवारी 2018

सटाणा : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या मनमानी कारभाराचा विरोध करीत शासनाने त्यांची तात्काळ इतरत्र बदली करावी आणि ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी बागलाण तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेतर्फे आज कामबंद करून पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. 

सटाणा : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या मनमानी कारभाराचा विरोध करीत शासनाने त्यांची तात्काळ इतरत्र बदली करावी आणि ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी बागलाण तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेतर्फे आज कामबंद करून पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. 

आंदोलक ग्रामसेवकांनी घोषणाबाजी करीत मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मंजूर करण्यास शासनाकडून सातत्याने टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ आज सकाळी दहा वाजता येथील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी सामुहिक रजा टाकून या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना नेहमीच पारदर्शी कामाबाबत आग्रही असते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या हुकुमशाही कार्यप्रणालीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे. 

शासनाने कंत्राटी ग्रामसेवकांची सेवा नियमित करावी, ग्रामविकास व विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती करावी, निलंबित ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना पुर्नस्थापित करावे, ग्रामसेवक संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांचे स्थायित्व मंजूर करावे, 12 व 14 वर्ष कालबद्ध पदोन्नतीचा लाभ द्यावा, आंतरजिल्हे बदल प्रस्ताव मार्गी लावावेत, गटविकास अधिकाऱ्यांना दिलेले निलंबनाचे अधिकार रद्द करावेत, ग्रामसेवकांना विनाचौकशी निलंबित करू नये आदी विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. शासन जोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांची बदली करून आमच्या मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. 

आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष एस.बी.भामरे, सचिव एस.एस.खैरनार, के.बी.इंगळे, शरद सोनवणे, स्वप्नील ठोके, बी.एन.ठोके, साहेबराव देवरे, एन.एम.सोनवणे, एस.एन.वाघ, आर.व्ही.कुवर, पी.के.बागुल, आर.आर.नांद्रे, जी.डी.गावित, वाय.ए.भामरे, योगेश धिवरे, रवी कापडणीस, एन.सी.वाघ, डी.एस.काकडे, के.ए.भामरे, सुवर्णा भामरे, नूतन देवरे, स्वाती देवरे, व्ही.आर.लांडगे, यु.आर.कडवे, योगेश सूर्यवंशी, पी.आर.पाटील आदींसह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. 

Web Title: Marathi news satana news agitation in jilha parishad