बेपत्ता विवाहितेचा चोवीस तासांत यशस्वी तपास

बेपत्ता विवाहितेचा चोवीस तासांत यशस्वी तपास

जळगाव - येथील कासमवाडीतील सोनाली भरत पाटील (वय 26) 23 जानेवारीला पती कामावर गेले असताना घरातून निघून गेली होती. त्यानंतर पतीसह माहेरच्यांनी शोध घेऊनही न सापडल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद झाली होती. एरवी तपासाचा मक्ता असलेल्या पुरुष पोलिसांना मागे सारत महिला कर्मचाऱ्यांनी बेपत्ता विवाहितेचा शोध लावून चोवीस तासांत रायगड जिल्ह्यातून शोधून आणत पती व आईच्या स्वाधीन केले.

चोवीस तास सातही दिवस कामाचा व्याप असलेल्या पोलिस दलात महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांची आता उणीव राहिलेली नाही. मोठ्या प्रमाणात महिला अधिकारी व कर्मचारी पुरुषी मक्तेदारी असलेल्या या खात्यात शिरल्या आहेत. सातच्या आत घरात राहणाऱ्या नोकरदार महिलांच्या मानसिकतेला छेद देत पोलिस दलातही महिला कर्तबगारी गाजवू लागल्या आहेत. किचकट गुन्ह्याचा तपास, बंदोबस्त असो, की अट्टल गुन्हेगाराला खाक्‍या दाखविण्याइतपत महिला कर्मचारी मक्तेदारी मोडून काढत पुरुषांची बरोबरी करू लागल्या आहेत.

शहरातील नेरी नाका भागातील कासमवाडीत नव्यानेच भाड्याच्या घरात वास्तव्यास असलेल्या खासगी नोकराची सव्वीसवर्षीय पत्नी बेपत्ता झाल्याची घटना 23 जानेवारीला घडली. कौटुंबिक कलहातून सोनाली पाटील घर सोडून निघून गेल्या. कुणालाही काही न सांगता रायगड जिल्ह्यातील रहिवासी वर्ग मैत्रिणीकडे जाऊन तेथे नोकरी शोधत होत्या. माहेरच्या मंडळींसह पतीने शोध घेऊनही सापडत नाही म्हणून 29 जानेवारीला हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली.

महिला कर्मचाऱ्यांची तपासचक्रे
तक्रारीसाठी आलेल्या आई व पतीच्या सुरवातीपासून ठाणे अंमलदार व महिला पोलिस अभिलाषा मनोरे म्हणणे ऐकून घेत होत्या. अखेर बेपत्ताची नोंद झाल्यावर निरीक्षक सुनील कुराडे याच्या सांगण्यावरून तपासाची धुरा उचलत श्रीमती मनोरे यांनी शोध सुरू केला. शालेय माहितीपासून ते ओळख परिचय, कौटुंबिक माहिती, कुटुंबातील कुरबूर ऐकून घेत जवळच्या मैत्रिणींना फोनवरून हुडकून काढले तेही काही तासांतच अखेर सोनाली अमुक एक मैत्रिणीची जीवलग असल्याचे कळाल्यावर तिचा शोध सुरू केला. रायगड जिल्ह्यातील नवघर (ता. जांभूळपाल) येथील कमलेश शर्मा यांच्या पत्नीची ती मैत्रीण असल्याचे समोर आले.

तपासाचा गुंता सुटत असतानाच सोनाली येथे काम शोधण्यासाठी आल्याची खात्री झाली अन्‌ तत्काळ महिला पोलिस श्रीमती मनोरे, संदीप पाटील यांनी रायगडकडे कूच केली. आठ ते दहा तासांच्या सलग प्रवासानंतर शोधाशोध केल्यानंतर बेपत्ता महिला सापडली. त्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करून सर्वजण माघारी परतले. चोवीस तासांत हरवलेल्या महिलेस सुखरूप परत आणून कायदेशीर पूर्तता केल्यावर पती व आईच्या ताब्यात देण्यात आले. कौटुंबिक वादावर पती-पत्नीसह नातलगांना तोडगा काढण्याची संधी देण्यात आली असून, निरीक्षक कुराडे, सहाय्यक निरीक्षक विजय आढाव, सचिन बागूल, समाधान पाटील यांच्यासह सहकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ तपास लावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक करून पहिल्याच तपासाचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com