जिल्हाधिकाऱ्यांसमोर टवाळखोरांचा कोचवर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

वैजनाथ काळे गंभीर जखमी - धावपटूंची छेडछाड, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर, दोघे ताब्यात; पोलिस यंत्रणेसमोर आव्हान

वैजनाथ काळे गंभीर जखमी - धावपटूंची छेडछाड, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर, दोघे ताब्यात; पोलिस यंत्रणेसमोर आव्हान

नाशिक - टवाळखोरांवर कारवाई, तसेच सुरक्षेची वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि गेंड्याची कातडी पांघरलेल्या पोलिस यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा फटका वैजनाथ काळे या ॲथलेटिक्‍स प्रशिक्षकाला आज बसला. शिबिरातील सरावासाठी आलेल्या धावपटूंना शिवीगाळ करत छेड काढणाऱ्या टवाळखोरांना प्रशिक्षकाने हटकले असता, हुज्जत घालत नंतर चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. जॉगिंगसाठी आलेल्या दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासमोर हा प्रकार घडला. प्रतिष्ठेच्या भागात सकाळी झालेल्या या घटनेमुळे नाशिककर हादरले आहेत. प्रशिक्षक काळे यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जाणूनबुजून कानाडोळा करणाऱ्या सुस्त पोलिसांना टवाळखोरांकडे लक्ष देण्यास वेळच नाही. त्यामुळे नागरिक, तसेच खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शहीद अरुण चित्ते पूल सुयोजित गार्डनच्या परिसरात धावपटू दररोज लांब पल्ल्याचा (रोड रनिंग) व खडतर मार्गाचा (हिल ट्रेनिंग) सराव करण्यासाठी येथे पहाटेपासूनच प्रशिक्षक व धावपटू येतात. जॉगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या तुलनेने कमी असते. गेल्या काही वर्षांपासून मोकाट दुचाकी, चारचाकी वाहने हाकणारे, तसेच युवती, धावपटूंची छेडछाड काढणाऱ्या टवाळखोरांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत पोलिस आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना या भागातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून, चर्चा करून व निवेदन देऊन सुरक्षिततेची मागणी केली, पण उदासीन पोलिस, प्रशासकीय यंत्रणेने या जॉगिंग ट्रॅककडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्यांना याकडे लक्ष देण्यास वेळच नसून पोलिसांना वसुली करण्यातच धन्यता वाटते. त्यांच्या या निष्काळजीपणामुळेच त्या भागात तीन-चार हाणामारीच्या घटना घडल्या आणि आजची घटना तर त्यावर कळसच म्हणता येईल. 

शहरात उन्हाळी क्रीडा शिबिरे सुरू आहेत. याच भागात गुरू द्रोणाचार्य स्पोर्टस्‌ असोसिएशनचे ॲथलेटिक्‍स प्रशिक्षक वैजनाथ काळे मुला-मुलींचे प्रशिक्षण घेत होते. सकाळी सव्वासातच्या सुमारास दोघे संशयित मद्यधुंद नशेत तेथे आले. त्यांनी काही मुलांना शिवीगाळ केली. त्यानंतर सहभागी मुलींना उद्देशून त्यांची छेडछाड काढण्याचा प्रयत्न केला. अश्‍लील शिवीगाळही केली. ही बाब प्रशिक्षक काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी दोघे संशयित समीर विश्‍वनाथ कांबळे (वय २७, रा. पोकार कॉलनी), नयुश कैलास कडलग (२०, रा. आनंदवली) यांना हटकले. त्यानंतर दोघांपैकी एकाने त्याच्याकडील चॉपर काढून प्रशिक्षक काळे यांच्या पोटावर, डोक्‍यावर वार केले. 

एकच गोंधळ, मुली भयभीत, जिल्हाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुले-मुली भयभीत झाले. एकच गोंधळ उडाला. त्याठिकाणी असलेले खेळाडू धावून आले. त्याच वेळी या भागात जॉगिंगसाठी आलेले जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. हे श्री. काळे यांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी तत्काळ पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांना दूरध्वनी केला आणि घटनेची माहिती दिली. काही वेळातच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मद्यधुंद अवस्थेतून दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रशिक्षक काळे यांना महात्मानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, दोघेही संशयित सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: murderer attack on vaijnath kale