नाशिकमधून ४८०० उमेदवार पहिल्या नेट परीक्षेला सामोरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

नाशिक - राष्ट्रीय स्तरावरील अधिव्याख्याता पदासाठी आवश्‍यक असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) शहर आणि जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर आज झाली. चार हजार ८७४ उमेदवार या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. दिवसभर चाललेल्या तीन विषयांच्या पेपरनंतर काठीण्य पातळीबाबत परीक्षार्थींनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या. दरम्यान, नाशिकमध्ये परीक्षा केंद्र झाल्याने दमछाक टळल्याची भावना परीक्षार्थींनी व्यक्‍त केली.

नाशिक - राष्ट्रीय स्तरावरील अधिव्याख्याता पदासाठी आवश्‍यक असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) शहर आणि जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर आज झाली. चार हजार ८७४ उमेदवार या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. दिवसभर चाललेल्या तीन विषयांच्या पेपरनंतर काठीण्य पातळीबाबत परीक्षार्थींनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या. दरम्यान, नाशिकमध्ये परीक्षा केंद्र झाल्याने दमछाक टळल्याची भावना परीक्षार्थींनी व्यक्‍त केली.

नेटची परीक्षा तीन सत्रांत पार पडली. शहरातील गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, एसएमआरके महिला महाविद्यालय, सिडकोमधील सिम्बायोसिस स्कूल, गुरू गोविंदसिंग पब्लिक स्कूल, देवळाली आणि नाशिक रोडचे केंद्रीय विद्यालय यांसह ग्रामीण भागातील कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टचे सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालय, ओझरचे केंद्रीय विद्यालय या केंद्रांवर परीक्षा झाली. देशभरातील नव्वद केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.  

पूर्वी नाशिकला केंद्र नसल्याने परीक्षार्थींना पुणे, मुंबई व औरंगाबादला जावे लागत असे. दमछाक टळल्याची भावना परीक्षार्थींनी व्यक्‍त केली. परीक्षा केंद्रांवर सकाळपासून लगबग बघायला मिळाली. परीक्षा फारशी अवघड नव्हती. ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला होता, त्यांच्यासाठी परिक्षा  सोपे असल्याची प्रतिक्रिया परीक्षार्थींनी व्यक्‍त केली.

इंदिरानगरला दोन केंद्रांवर  ९०० परीक्षार्थी हजर
इंदिरानगर - शहरात पहिल्यांदाच होत असलेल्या नेट परीक्षेचे केंद्र असलेल्या गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयात ७२० पैकी ५७३ आणि गुरू गोविंदसिंग पब्लिक स्कूलमध्ये ४२० पैकी ३४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. नेटची शहरात सोय झाल्याने अनेकांनी विशेषतः महिला प्राध्यापक आणि युवतींनी समाधान व्यक्त केले.

गतवेळी परीक्षा जळगावला होती. पत्नी प्राजक्ता गरोदर होती. प्रवासात मोठी गैरसोयही झाली. यंदा आमची छकुलीदेखील बरोबर आहे. परीक्षा येथेच असल्याने मानसिक तणावरहित परीक्षेला पत्नी सामोरी जात आहे. 
- कमलेश कासार

प्रत्येक वेळी प्रपंच सांभाळून इतर ठिकाणी परीक्षेला जाण्यासाठी स्वतंत्र तयारी करावी लागायची. बाहेरगावी राहायची आणि इतर बाबींची मोठी परीक्षाच असायची. येथेच परीक्षा असल्याने यंदा तयारीदेखील चांगली झाली.
- अर्चना ढोमसे, परीक्षार्थी

पहिल्यांदाच ही परीक्षा देत आहे. बाहेरगावी असलेल्या परीक्षेला जाताना होणारी दमछाक मित्रांकडून ऐकली होती. नाशिकमुळे ताणतणावातून सुटका झाली. 
- दिगंबर भारस्कर, विद्यार्थी

पहिल्या पेपरमधील दहा प्रश्‍न घटविले
नेट परीक्षेंतर्गत तीन पेपर झाले. पेपर क्रमांक १ मध्ये यापूर्वी साठ प्रश्‍न विचारले जात होते. त्यांपैकी पन्नास प्रश्‍न सोडवावे लागत होते; परंतु यंदापासून पेपर क्रमांक १ मध्ये दहा प्रश्‍न घटवत पन्नास प्रश्‍न विचारण्यात आले. पेपर क्रमांक २ मध्येदेखील पन्नास प्रश्‍न होते. पेपर क्रमांक ३ मध्ये ७५ प्रश्‍न होते. हे सर्व प्रश्‍न सोडविणे बंधनकारक होते.