कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्तायादी अखेर जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

नाशिक - महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी काल गुणवत्तायादी जाहीर केली जाणार होती. मात्र एक दिवसाच्या विलंबाने आज दुपारनंतर ही अंतिम गुणवत्तायादी जाहीर करण्यात आली. आता विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता. 10) जाहीर होणाऱ्या प्रवेशाच्या पहिल्या वाटप यादीची प्रतीक्षा असणार आहे.

कृषी परिषदेच्या संकेतस्थळावर कालपासून विद्यार्थ्यांकडून भेट देत अंतिम गुणवत्तायादी तपासण्याचा प्रयत्न सुरू होता. आज सकाळी काही काळ संकेतस्थळ बंद पडले होते. मात्र दुपारनंतर विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्तायादी उपलब्ध झाली. यात पदवी अभ्यासक्रमासाठीची अंतिम गुणवत्तायादी तसेच विद्यापीठनिहाय अंतिम गुणवत्तायादी उपलब्ध करून दिलेली आहे. दरम्यान, आता अंतिम गुणवत्तायादी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी (ता. 10) प्रसिद्ध होणार असलेल्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या वाटप यादीकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर यंदाच्या प्रवेशासंदर्भातील कट-ऑफचा अंदाज स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

बाद विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर
अंतिम गुणवत्तायादीप्रमाणे काही त्रुटींमुळे प्रवेशप्रक्रियेतून बाद ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाची यादीदेखील संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. अर्ज भरण्यातील तांत्रिक चुका, कागदपत्रांमधील कमतरता किंवा चुका, पात्रता पूर्ण नसणे, दुय्यम अर्ज अशा विविध कारणांवरून अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने दुय्यम अर्जा (डुप्लिकेट फॉर्म)मुळे बाद होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.

Web Title: nashik news agriculture syllabus admission final merit list declare