‘जिल्हा रुग्णालयांत सर्व सुविधा देणार’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

नाशिक - राज्यातील शासकीय रुग्णालयांत ज्या ठिकाणी इन्क्‍युबेटर्ससह अन्य सुविधांअभावी नवजात अर्भकांचे मृत्यू होत आहेत, तेथील आढावा घेऊन सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्हा व संदर्भ रुग्णालयेही या सुविधांपासून वंचित राहणार नाही. तेथेही जातीने लक्ष देऊन सुविधा मिळतील, असे आश्‍वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज दिले. आगामी काळात सामाजिक बांधलकीच्या भावनेतून पालकांच्या जनजागृतीसाठी कुपोषणावर परिषदा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

नाशिक - राज्यातील शासकीय रुग्णालयांत ज्या ठिकाणी इन्क्‍युबेटर्ससह अन्य सुविधांअभावी नवजात अर्भकांचे मृत्यू होत आहेत, तेथील आढावा घेऊन सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्हा व संदर्भ रुग्णालयेही या सुविधांपासून वंचित राहणार नाही. तेथेही जातीने लक्ष देऊन सुविधा मिळतील, असे आश्‍वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज दिले. आगामी काळात सामाजिक बांधलकीच्या भावनेतून पालकांच्या जनजागृतीसाठी कुपोषणावर परिषदा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

जिल्हा रुग्णालयांतील अर्भकांचे मृत्युप्रकरण व तेथील अव्यवस्थेचे विदारक चित्र ‘सकाळ’ने ‘इन्क्‍युबेटरचा कोंडवाडा’ या वृत्तमालिकेच्या अनुषंगाने मांडले. त्यानंतर डॉ. सावंत यांनी आज या प्रकरणाची माहिती घेतली. या वेळी त्यांनी संपादकीय विभागाशी संवाद साधला. जिल्ह्यासह राज्यातील आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेत चर्चा केली. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, आमदार जयवंत जाधव, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, संदर्भ सेवा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ घुटे हेही उपस्थित होते.

राज्यातील जिल्हा रुग्णालयांत अर्भकांच्या अतिदक्षता विभागात प्रसूतिपूर्व जन्मलेली व अपुऱ्या वजनाची (एक किलो वजनापेक्षा कमी वजनाची) अर्भके दाखल होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे सांगताना डॉ. सावंत म्हणाले, की आरोग्याच्या प्रश्‍नांबाबत सरकार गंभीर आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. नाशिकच्या घटनेनंतर आम्ही राज्यातील रुग्णालयांचा आढावा घेत आहोत. ज्या ठिकाणी नवजात अर्भकांसाठी सुविधा हव्या असतील त्या त्वरित उपलब्ध करून दिल्या जातील. यात जिल्हा संदर्भ रुग्णालयांचाही समावेश असेल. 

गोरखपूरशी तुलना अयोग्य
या घटनेची गोरखपूरमधील बालमृत्यू प्रकरणाशी तुलना अयोग्य आहे, असे स्पष्ट करत डॉ. सावंत म्हणाले, की राज्यातील नवजात बालकांचे मृत्यूचे प्रमाण हे १२ टक्के आहे; तर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हेच प्रमाण दहा टक्‍क्‍यांच्या आत आहे. गेल्या वर्षभरात ९७६ कमी वजनाची व प्रसूतिपूर्व अर्भके वाचविण्यात यश आलेले आहेत. यातही ७२ अर्भके ही ५०० ते ६०० ग्रॅम इतक्‍या अल्प वजनाची होती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा संबंधित कक्षाने केलेल्या चांगल्या कामाकडे दुर्लक्षही व्हायला नको, असे त्यांनी सूचित केले.

समितीतर्फे दोन दिवसांत चौकशी
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या निकषांनुसार जिल्हा रुग्णालयात इन्क्‍युबेटरची संख्या १४ निर्धारित असताना नाशिकला १८ इन्क्‍युबेटर्स आहेत. मात्र, नवजात अर्भकांची भरती होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण ‘एनएसआयसीयू’वर येतो. यावर तातडीची उपाययोजना म्हणून महिनाभरात अतिरिक्त सात नवीन इन्क्‍युबेटर्स उपलब्ध केले जातील. महिनाभरात ५५ नवजात अर्भके दगावण्याची बाब गंभीर असून, या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी ‘न्युओमेटॉलॉजिस्ट’ तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या समितीतर्फे दोन दिवसांत चौकशी केली जाईल, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

Web Title: nashik news all facility give by district hospital