गोळीबारातील जखमीचे पोलिसांवर पक्षपातीपणाचे आरोप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

गोळीबाराचा बनाव रचल्याचा पोलिसांचा संशय

नाशिक - आठवडाभरापूर्वी वडनेर गेट येथे गावठी कट्ट्यातून गोळी झाडून जखमी झालेला शिवमिलन सिंह याने पोलिसांवर संशयितांना अटक न करताना पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला. या संदर्भात पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत हा गोळीबारच बनाव रचून केल्याचा संशय व्यक्‍त केला. 

गोळीबाराचा बनाव रचल्याचा पोलिसांचा संशय

नाशिक - आठवडाभरापूर्वी वडनेर गेट येथे गावठी कट्ट्यातून गोळी झाडून जखमी झालेला शिवमिलन सिंह याने पोलिसांवर संशयितांना अटक न करताना पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला. या संदर्भात पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत हा गोळीबारच बनाव रचून केल्याचा संशय व्यक्‍त केला. 

७ जुलैला रात्री साडेदहाच्या सुमारास वडनेर गेट येथे शिवमिलन सिंह याचे वाहन रोखून संशयित अनिल अपसुंदे (रा. दिंडोरी), तरुण सोमनानी, योगेश सोमनानी, शंकर सोमनानी (सर्व रा. उपनगर) यांनी ३० लाखांची मागणी केली. पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने संशयित अनिल अपसुंदे याने शिवमिलन याच्या डोक्‍याला गावठी कट्टा लावला आणि गोळी झाडताना त्याने झटका दिला. त्यामुळे ती गोळी त्याच्या डाव्या हाताला लागल्याचे उपनगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

यासंदर्भात शिवमिलन सिंह याने आज पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर पक्षपातीपणाचे आरोप केले. चारही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी करून सोडून दिले. संशयितांनी न्यायालयात सादर केलेला अटकपूर्व जामीनही फेटाळला आहे. परंतु, पोलिस त्यांना अटक करीत नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे शिवमिलन सिंह याने सांगितले.

घटनेचा तपास करीत असलेले पोलिस उपनिरीक्षक लांडे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी शिवमिलन सिंह याचे आरोप फेटाळून लावले. सिंह याच्या आरोपानुसार संशयित चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता घटनेच्या वेळी ते घरीच असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सिंह स्वत: गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, खंडणीच्या गुन्ह्यातून काही महिन्यांपूर्वीच तो सुटून आला आहे. तसेच त्याने ज्यांच्यावर आरोप केले आहेत, ते त्याच्यापूर्वीच्या गुन्ह्यातील साक्षीदार आहेत. त्याचा राग मनात धरून त्याने हे कृत्य केल्याचा संशय आहे. तसेच ज्या पद्धतीने गोळी लागली आहे, त्यावरून त्याने या घटनेचा बनाव रचल्याचाच पोलिसांचा संशय आहे.

कोण आहे शिवमिलन सिंह
शिवमिलन सिंह देवळाली कॅम्प येथे सैन्यात होता. त्याने राजीनामा दिल्यानंतर जेल रोड परिसरात जिम सुरू केली. २०१२-१३ मध्ये त्याच्यावर अनधिकृतरीत्या गावठी कट्टा बाळगल्याचा गुन्हा आहे. तसेच पिंपळगाव बसवंत पोलिसांत खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. यामध्ये त्याला तीन वर्षांची शिक्षा झाली होती. त्यातून तो काही महिन्यांपूर्वीच शिक्षा भोगून बाहेर आला. या प्रकरणात अनिल अपसुंदे याच्या मदतीने पोलिसांनी शिवमिलन सिंह यास मध्य प्रदेशातून अटक केली होती. सोमनाणी यांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे अपसुंदे व सोमनानी यांना अडकविण्यासाठी त्याने गोळीबाराचा बनाव रचल्याचे बोलले जाते.