नाशिकच्या सुंदर नारायण मंदिरात बहरले 'सकाळ-कलांगण'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

रंगकर्मी डॉ. राजेश आहेर यांनी 'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकातील प्रसंगावर अभिनय सादर करत उपस्थित कला रसिकांकडून दाद मिळविली. तत्पूर्वी शाहीर वैभव पिंगळे यांनी पोवाडा सादर केला. प्रफुल्ल पवार व रामेश्‍वर काळे यांनी त्यांना साथ दिली. पोवाडा सादरीकरणावेळी परीसरातील वातावरण शिवमय झाले होते. 'सकाळ'मध्ये विविध सदरांतून व्यंगचित्र रेखाटणारे शिवाजी गावडे यांनी यावेळी व्यंगचित्र रेखाटनाचे प्रात्यक्षिक सादर केले.

नाशिक : गोदा काठावर वसलेल्या श्री सुंदर नारायण मंदिर परीसरात रंग-रेषांची कॅनव्हासवर सुरू असलेली उधळण. परीसरातील सौंदर्य टिपण्याची चित्रकारांची धडपड. चित्रकारांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी तितक्‍याच ताकदीनं अभिनय सादरीकरण अन्‌ कविता लयबद्ध वाचन, असे उल्हासमयी वातावरण कार्यक्रम स्थळी अनुभवायला मिळाले. 'सकाळ-कलांगण'च्या आजच्या उपक्रमात चित्रकार, कलावंतांना दाद देण्यासाठी कलाप्रेमींनीही गर्दी केली होती. सुंदर नारायण मंदिर प्रांगणात 'सकाळ-कलांगण' बहरले होते.

कलांगणातील निवडक छायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

दिग्गज चित्रकारांनी उपक्रमात सहभागी होत मंदिर व परीसरातील दृष्य कॅनव्हासवर उतरविले. हौशी चित्रकारांनीही सहभाग नोंदवत चित्र रेखाटनाचे धडे गिरविले. यावेळी रंगकर्मी डॉ. राजेश आहेर यांनी 'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकातील प्रसंगावर अभिनय सादर करत उपस्थित कला रसिकांकडून दाद मिळविली. तत्पूर्वी शाहीर वैभव पिंगळे यांनी पोवाडा सादर केला. प्रफूल्ल पवार व रामेश्‍वर काळे यांनी त्यांना साथ दिली. पोवाडा सादरीकरणावेळी परीसरातील वातावरण शिवमय झाले होते. 'सकाळ'मध्ये विविध सदरांतून व्यंगचित्र रेखाटणारे शिवाजी गावडे यांनी यावेळी व्यंगचित्र रेखाटनाचे प्रात्येक्षिक सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्फूर्त दाद मिळाली.

कार्यक्रास 'सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, श्री सुंदर नारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब पुजारी, अमेय पुजारी, 'फ्रेंड सर्कल'चे जयप्रकाश जातेगावकर, ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार, भि. रा. सावंत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायचित्रकार राजेश सावंत, गीतकार संजय गिते, व्यंगचित्रकार ज्ञानेश बेलेकर, कालिका मंदिर ट्रस्टचे खजिनदार सुभाष तळाजिया, आर्किटेक्‍ट प्रफुल्ल कारखानीस, अधिष्ठाता बाळ नगरकर यांच्यासह कला क्षेत्रातील अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली.

सकाळी आठपासून कलाकारांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत कलारसिकांनीही कला सादरीकरणावेळी पुरेपुर आनंद लुटला. पुढील उपक्रमांतही अशाच प्रकारे उत्स्फूर्त सहभागी होण्याची ग्वाही कलावंत, कलाप्रेमींनी देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.